इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी मोठे फेरबदल केले आहेत. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेवर येऊन केवळ 8 महिनेच झाले असताना मोठे फेरबदल झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. इम्रान खान यांनी यापूर्वीच अर्थमंत्री असद उमर यांना हटवल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त व्हायला लागले होते. आता त्यांच्या पाठोपाठ मंत्रिमंडळातील अन्य महत्वाच्या मंत्र्यांनाही हटवण्यात आले आहे. “नया पाकिस्तान’ निर्माण करण्यासाठी इम्रान खान यांनी हे मोठे फेरबदल केले असल्याचे बोलले जात आहे. याच “नया पाकिस्तान’च्या निर्मितीसाठी इम्रान खान यांनी आपल्या विश्‍वासातील सहकाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले होते. आता त्यांनाच हटवण्यात आल्यामुळे इम्रान यांच्या हेतूंबाबत शंकाही व्यक्‍त व्हायला लागली आहे.

असद उमद हे पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील सर्वात अधिक शिक्षित केंद्रीय मंत्री होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानसाठी मोठे आर्थिक पॅकेज मिळवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका होती. मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्या धोरणांवर टीका होत होती. चीन समर्थक गटाने त्यांच्यावर थकित कर्जाबाबतच्या टिप्पणीवरून टीका केली होती. मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर त्यांनी उर्जा मंत्रालय स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांच्या जागेवर अब्दुल हाफिझ शेख यांना पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार नियुक्‍त केले आहे. त्यांच्या पाठोपाठ आरोग्य मंत्री आमिर कियानी यांनाही हटवण्यात आले आहे. पंजाब आणि खैबर पख्तुनवा प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांना अधिक चांगल्या प्रशासन राबवण्याबाबत इम्रान यांनी सुनावलेही आहे. या दोन्ही प्रांतांमध्ये पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाची खराब कामगिरी झाली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.