पुणे – लष्कर भरती प्रक्रियेतील पेपर फुटी प्रकरणात मेजर दर्जाचे अधिकारी वसंत विजय किलारी (वय 45, रा. दिल्ली, मूळ. आंध्र प्रदेश) यांना गुन्हे शाखेने दिल्ली येथून अटक केली. त्यांना 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष एस. आर. नावंदर यांनी दिला आहे. तामिळनाडू येथून अटक केलेला थिरू मगरून थंगवेल यांनी व्हॉट्स ऍपवरून लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका लिक केली होती.
थिरू यांना वसंत यांनीच ती पाठविली आहे. त्यांनी ती कुठून मिळविली, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी केली.
थिरू मुरुगन थंगवेलू (वय 47, रा. तमिळनाडू), किशोर महादेव गिरी (वय 40, रा. बारामती), माधव शेषराव गिते (वय 39, रा. सॅपिअर विहार कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (वय 39, रा. दिघी), उदय दत्तू औटी (वय 23, रा. खडकी), भारत लक्ष्मण अडकमोळ (वय 37, रा. पाचोरा) या सहा जणांना याप्रकरणात यापूर्वीच अटक केली आहे. त्यापैकी किशोर, माधव आणि उदय हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित तिघे पोलीस कोठडीत आहेत. तर, अन्य दोघांवर गुन्हा दाखल आहे. लष्कराच्या रिलेशन आर्मी अंतर्गत गेल्या आठवड्यात पुण्यासह देशात 43 ठिकाणी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार होती.
या परीक्षेत देशभरातील 40 हजार उमेदवार बसले होते. मात्र, या परीक्षेची प्रश्नपत्रिका पुण्यात फुटल्याची माहिती लष्करी गुप्तचर (एमआय) विभागाने पुणे पोलिसांना दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. वसंत यांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांनी आणखी कोणाला प्रश्नपत्रिका पाठविली आहे. वसंत आणि यापूर्वी अटक केलेले थिरू यांच्यात काय व्यवहार झाला आहे. याबाबत तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली.