मेजर नेटके यांच्या टीमची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये नोंद

कारगिल विजय दिवसाच्या प्रित्यर्थ इंडस नदीमध्ये केले 210 किलोमीटरचे राफ्टिंग

सातारा – आंबवडे (ता. कोरेगाव) येथील भारतीय सैन्य दलातील अधिकारी दीपक केशव नेटके यांच्या नेतृत्वाखालील टीमने जम्मू काश्‍मीर येथील लेहमधील इंडस नदीमध्ये कारगिल विजय दिवसाच्या प्रित्यर्थ 210 किलोमीटरचे रिव्हर राफ्टिंग केले. मेजर दीपक नेटके यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने केलेल्या या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये घेण्यात आली आहे. दीपक (रा. नेटके-आंबवड) गेली 11 वर्षे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. सध्या ते मेजर या पदावर आहेत. त्यांची नियुक्ती जम्मू काश्‍मिर येथील लेह येथे आहे. सैन्यदलात ते नेहमीच विविध उपक्रम राबवित असतात.

कारगिल विजय दिवसाला आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या विजय दिवसाच्या प्रित्यर्थ कारगिल युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मेजर दीपक नेटके व त्यांच्या 27 जणांच्या टीमने समुद्रसपाटीपासून 13 हजार 700 फूटांवरील इंडस नदीमध्ये दि. 18 ते 20 जुलै दरम्यान तब्बल 210 किलोमीटरचे रिव्हर राफ्टिंग करुन एक विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये घेण्यात आली. या विक्रमाबद्दल कारगिल युद्धामध्ये हिरो ठरलेले सध्याचे लेफ्टनंट जनरल, अति विशेष सेवा पदक प्राप्त वाय. के. जोशी यांनी निमो या सैन्यदलाच्या तळावर येऊन मेजर नेटके व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. नेटके यांचे येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.