मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ममता बॅनर्जींकडून राज्यात मोठे बदल

कोविड नियंत्रणास प्राधान्य देण्याची भूमिका व्यक्‍त हिंसाचारालाही घालणार लगाम

कोलकाता -तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी  पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यपाल जगदीप धनकर यांनी त्यांना अधिकारपदाची आणि गुप्ततेची शपथ दिली. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राजभवनात अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा झाला. ममतांनी बंगाली भाषेत शपथ घेतली.

या शपथविधीचा कार्यक्रम सुरू असतानाच तिकडे भाजप मुख्यालयात मात्र बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अन्य प्रादेशिक नेते उपस्थित होते.

दरम्यान, त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांचा शपथविधी 9 मे रोजी होणार आहे. त्या दिवशी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आहे. ती संधी साधून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, राज्यातील करोना स्थिती नियंत्रणात आणणे हे माझे पहिले कर्तव्य मी मानते. त्यामुळे या कामालाच आपले सरकार प्राधान्य देणार आहे. आपण राज्यातील करोना स्थितीबाबत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर आजच बैठक घेणार आहोत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राज्यात उद्‌भवलेल्या हिंसाचाराच्या स्थितीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, या स्थितीचाही आपण कठोरपणे मुकाबला करणार आहोत. राज्यात शांतता प्रस्थापित करणे ही माझी दुसरी प्राथमिकता असेल असे त्यांनी नमूद केले. कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सर्व शक्‍य ती उपाययोजना करू असे त्यांनी सांगितले. हिंसाचार माजवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

तसेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लगेचच सूत्रं हातात घेत पोलीस प्रशासनात मोठे बदल केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी जवळपास २९ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या आधी या अधिकाऱ्यांची बदली केली होती. ज्या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा राज्यात आणण्यात आलं आहे त्यामध्ये महासंचालक विरेंद्र, अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) जावेद शमीम आणि महासंचालक (सुरक्षा) विवेक सहाय यांचा समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी यासंबंधी आदेश काढण्यात आले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.