Gujrat । Ganesh Visarjan : गुजरातमधील गांधीनगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील देहगाम तालुक्यातील वसना सोगठी गावात गणेश विसर्जनाच्या वेळी बुडून आठ तरुणांचा मृत्यू झाला आहे.
डीएसपी डीटी गोहिल यांनी सांगितले की, गावातील 9 तरुण दुपारी मेश्वो नदीवर बांधलेल्या धरणावर आले होते. ते येथे स्नान करीत होते. तेवढ्यात गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी आली.
आंघोळ करत असताना नऊ तरुणांपैकी एक तरुण बुडू लागला आणि त्याला वाचवण्यासाठी लोक पाण्यात शिरले. यावेळी काही लोकांचा बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम अजूनही तैनात आहे. असं देखील त्यांनी सांगितलं.
जिल्हा प्रशासनाने अग्निशमन विभाग आणि स्थानिक प्रशासनाला बचावकार्यासाठी तैनात केले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेले स्थानिक आमदार बलराज सिंह चौहान म्हणाले की, ग्रामपंचायतीने लोकांना सतर्क केले होते. प्रशासनाने चेक डॅमपासून दूर सुरक्षित विसर्जन क्षेत्र निश्चित केले होते.
यानंतरही काही अतिउत्साही तरुणांनी नदीत प्रवेश केला. यानंतर हा अपघात झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाह खूप जोरात होता. यानंतर त्यांनी ग्रामस्थांसह स्थानिक प्रशासनाला माहिती दिली.
माहिती मिळताच पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. नदीत स्नान करताना किंवा मूर्तीचे विसर्जन करताना विशेषत: नद्या किंवा तलावातील पाणी ओसंडून वाहत असताना प्रशासनाकडून खबरदारी घेण्यास सांगितले जाते.
नुकतेच गुजरातला पुराचा तडाखा बसला असून अनेक शहरांमध्ये रस्ते जलमय झाले आहेत. येथील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली होती. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेचा इशारा दिला होता.