राज्यातील सत्ता टिकविणे तुमच्यासाठी संकट; प्रविण दरेकरांची बाळासाहेब थोरातांवर टीका

मुंबई : राज्यातील सत्ता टिकविणे हे तुमच्यासाठी संकट झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार एकत्र काम करत आहे, मग पृथ्वीराज चव्हाण यांना हे सरकार आपले का वाटत नाही का?, असा सवाल भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना केला.

महाविकास आघाडीच्या एकत्रित पत्रकार परिषदेवरही त्यांनी टीका केली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे वस्तुस्थितीपर मुद्दे मांडले ते खोडून काढण्यासाठी राज्यातील तीन मंत्र्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. पण ही पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार ठरला आणि महाविकास आघाडीची पत्रकार परिषद बिघाडी झाली, असेही ते म्हणाले.

आम्ही निर्णय घेणारे नाही असे राहुल गांधी का म्हणत आहेत? असा सवाल दरेकर यांनी केला. तुम्ही जर एकत्रित आहात तर विजय वडेट्टीवार यांनी १० हजार एसटी मोफत सोडण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले? उद्योग विषयक केंद्राच्या योजनांचा फायदा घेऊन धोरणे आखायला हवीत आणि महाराष्ट्राचे स्थान अबाधित ठेवायला हवे. पण उद्योगधंदे सुरळीत करण्याचे नियोजन या सरकारमध्ये नाही. ५० हजार उद्योग सुरु करण्याची घोषणा केली पण प्रत्यक्षात उद्योग सुरु झाले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.