नगर जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेचा संभ्रम कायम

नगर: जिल्हा परिषदेतील वर्ग-3 मधील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठीच्या ऑनलाइन परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी असताना प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावे लागले.आता उमेदवारांना एका पदासाठी किती ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देता येईल, याबाबतचे स्पष्टीकरण शासनाने अद्यापही दिलेले नाही. त्यातच या पदांसाठी येत्या ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील हजारो उमेदवार संभ्रमात आहेत.
24 ऑगस्ट 2017 आणि 23 जुलै 2018 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्यांमध्ये महापरीक्षा पोर्टलने कमालीची गफलत केली आहे.

35 जिल्हा परिषदांतील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचा सल्ला पोर्टलने दिला. त्यामुळे एकाच पदासाठी 35 जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करण्याची संधी असलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 17 हजार तर आरक्षित प्रवर्गासाठी 12,500 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागले आहे. आता जिल्हा परिषदेतील रिक्त पदासाठी एकाच दिवशी परीक्षा झाल्यास उमेदवारांना किती ठिकाणी परीक्षा द्यावी लागेल, याबाबत कोणतीही माहिती महापरीक्षा पोर्टलने दिलेली नाही, तसेच परीक्षेचे वेळापत्रक कसे राहील, याबद्दलही उमेदवार अनभिज्ञ आहेत. येत्या ऑगस्टमध्ये परीक्षा होण्याची चर्चा आहे; मात्र संभ्रम अद्यापही कायम आहे.

जिल्हा परिषदेत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. जिल्हा परिषदेतील वर्ग-3 मधील कर्मचाऱ्यांची भरती ऑनलाइन प्रक्रियेतून करण्याची तयारी शासनाने केली. 24 ऑगस्ट 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा निवड समितीकडून ही भरती प्रक्रिया काढून घेण्यात आली. त्या शासन निर्णयानुसार राज्यस्तरावर उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्याचे ठरले. पदाचा अर्ज करताना उमेदवारांना कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती हवी आहे, त्यासाठी 1 ते 35 जिल्हा परिषदांचा पसंतीक्रम देण्याचे म्हटले. त्यानंतर 23 जुलै 2018 च्या नव्या निर्णयानुसार ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यभर या पदांची परीक्षा घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

राज्यात प्रत्येक पदासाठीचे वेळापत्रक सारखेच असले तरी उमेदवारांना 35 जिल्हा परिषदांतील एकाच संवर्गाच्या पदासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचा सल्ला महापरीक्षा पोर्टलच्या मेसेजद्वारे दिला. प्रत्येक पदासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेचा स्वतंत्र अर्ज केल्यास खुल्या प्रवर्गाला प्रतिअर्ज 500 रुपये, तर राखीव गटातील उमेदवारांकडून 350 रुपये शुल्क आकारले. त्यातून राज्यातील बेरोजगारांची आर्थिक पिळवणूकही झाली आहे. विशेष म्हणजे, एका पदासाठी एकाच दिवशी परीक्षा होणार असताना उमेदवारांना एकाच ठिकाणी परीक्षा देण्याची संधी आहे. त्यामुळे उमेदवारांकडून केवळ शुल्काची रक्कम वसूल करण्यासाठी पसंतीक्रमाचा पर्याय देण्याऐवजी स्वतंत्र अर्ज करण्याचा अट्टहास महापरीक्षा पोर्टलने केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)