मेन स्टोरी : तिसरा शोकान्त सामना (भाग ३)

जयसिंग पाटील (लेखक ज्येष्ठ पत्रकार, माध्यम अभ्यासक, नाट्यलेखक व कादंबरीकार आहेत.)

महाराष्ट्रातला सहकार रुजला वाढला, त्याला पहिल्या पिढीतले अनुभव, परिश्रम कारणीभूत होते. हे नेतृत्व स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यातून तयार झाले होते. अपवाद वगळता कॉंग्रेसचा विचार प्रमाण मानत होते. पंडित नेहरूंचा, समाजवादी विचारांचा प्रभाव त्यातल्या बहुतेक नेत्यांवर होता. पश्‍चिम महाराष्ट्रातले हे नेते बहुजन मराठा समाजातले होते. ते कसे बदलत गेले. सत्तेच्या सावलीत सरंजामीवृत्तीचे बनत गेले. त्यांची मुले तर राजे आणि युवराज बनले. त्याचे सविस्तर, खोलवरचे चित्रण रंगनाथ पठारे यांच्या ताम्रपट कादंबरीत दिसून येते. राजकारण्यांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीचे सैरभैर होणे, त्यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणे आणि त्यात ते किती आणि कसे टिकून उभे राहतात हे पाहणे म्हणजे तिसरा सामना आहे.

सांगलीत सहकारातल्या किंवा राजकारणातल्या सत्ता साम्राज्याला हादरे बसलेले वसंतदादा घराणे हे काही एकमेव नाही. वसंतदादा गटाचे म्हणून ज्यांना कधीकाळी ओळखले जाते होते त्या अकलूजकर मोहिते पाटील घराण्याची अवस्था अशीच झाली आहे. सहकाराच्या खासकरून साखऱ कारखानदारीच्या माध्यमातून शंकरराव मोहिते पाटील यांचे राजकीय साम्राज्य तयार झाले. शंकरराव मोहिते पाटील यांच्या शब्दाला कॉंग्रेसमध्ये मोठे वजन होते. त्यांचे पुत्र विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विवाहसोहळ्यातील लक्षभोजन हा देशात चर्चेचा विषय झाला होता.

नेत्यांच्या मुलांचे असे थाटामाटाचे मोठे विवाह आज सरसकट होत असतात. त्यातले श्रीमंतीचे प्रदर्शन डोळे दिपवून टाकणारे असते. अशा विवाहांचे प्रवर्तक मोहिते पाटील म्हणावे लागतील. आणीबाणीनंतरच्या एका विधानसभेच्या निवडणुकीत शंकरराव मोहिते पाटील यांना पराभवाचा दणका बसला. हा अपवाद होता. मोहिते पाटील घराण्याची सत्ता नंतरच्या पिढीत अबाधित राहिली. शरद पवारांच्या कृपेने विजयसिंह मोहिते पाटील मंत्री, उपमुख्यमंत्री झाले. साखर कारखाने, जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद अशा सगळ्या ठिकाणी मोहिते पाटील घराण्याचीच सत्ता राहिली. विरोधी गोटात जाऊन प्रतापसिंह मोहिते पाटील खासदार झाले. मोहिते पाटील यांचा विधानसभेला पराभव झाला.

मोहिते पाटील विरोधकांनी ठरवून भारत भालके यांच्या मागे आपली ताकद लावल्याची चर्चा तेव्हा होती. पवार घराण्यातील अजित पवार यांच्या राजकारणामुळे हा पराभव झाल्याचे म्हटले जाते होते. कन्या सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभा मतदार संघात सोय लावल्यानंतर शरद पवारांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली. गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना संधी मिळाली. आता शरद पवारांनी पुन्हा आपला मोहरा पुढे केला. नंतर माघार घेतली. पुन्हा उमेदवारी मिळत नाही असे दिसताच पुत्राच्या रुपाने मोहिते पाटील भाजपच्या तंबूत दाखल झाले. राष्ट्रवादीने मोहिते पाटील विरोधक संजय शिंदेना रिंगणात उतरवले आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याऐवजी भाजपने रणजितसिंह निंबाळकराना उमेदवारी दिली आहे. अर्थात मोहिते पाटील याना मुख्यमंत्र्यानी काही आश्वासने दिली असतील.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सहकार सम्राटांच्या नातवांना भाजपने पळवून नेले, त्यापैकी एक रणजितसिंह मोहिते पाटील आणि दुसरे आहेत डॉ. सुजय विखे पाटील. महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचे हे पणतू. कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र. आता ते नगरमधून भाजपचे लोकसभेचे उमेदवार आहेत. वसंतदादा, शंकरराव मोहिते पाटील यांच्याइतकेच विठ्ठलराव विखे पाटील हे सहकार चळवळीतले मोठे नाव. नगर जिल्ह्यात सर्वाधिक सहकारी साखऱ कारखाने आहेत. साखर सम्राटांची संख्याही जास्त आहे. वसंतदादांच्या विनाअनुदान शिक्षणसंस्थाच्या धोरणाचा फायदा उठवून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये ज्यांनी काढली त्यामध्ये सर्वच जिल्ह्यातील साखरसम्राट होते. तसे ते नगर जिल्ह्यातही आहेत.

विठ्ठलरावांच्यानंतर त्यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील वारसदार झाले. शरद पवारविरोधी राजकारणामुळे त्यांना काहीवेळा पराभव पत्करावा लागला, पण कोपरगाव लोकसभा मतदारसंघात किंवा नगरच्या राजकारणात विखेपाटील यांच्या शब्दाला वजन होते. कोणत्याही उमेदवाराच्या विजयात किंवा पराभवात त्यांची भूमिका निर्णायक ठरत होती. शिवसेनेच्या मदतीने बाळासाहेब विखे पाटील केद्रात मंत्री झाले.

याच शिवसेनेच्या मदतीने राधाकृष्ण विखे पाटील मंत्री झाले. नंतर कॉंग्रेसच्या माध्यमातून मंत्री आणि विरोधीपक्षनेतेही झाले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपात शरद पवारांनी नगरची जागा कॉंग्रेसला देणे नाकारले. उमेदवारी मिळत नाही असे दिसताच सुजय यांनी सरळ भाजपचा झेंडाच हाती घेतला. भाजपसाठी हा मोठा मासा आयताच गळाला लागला. त्यांनी विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना बाजुला सारून विखे पाटील यांच्या नव्या पिढीला संधी दिली.

सत्ताकांक्षी नेत्यांचे, सहकारसम्राटांचे राजकारण तीन-चार पिढ्यामध्ये कोणत्या वाटावळणांनी गेले आहे, ते वरिल तीन उदहारणांवरून स्पष्ट व्हावे. या नव्या नेतृत्वाला सत्तेची आकांक्षा आहे. मागील पिढ्यांनी तयार केलेले मैदान त्यांच्यासमोर आहे. ग्रामीण विकास किंवा सहकारी चळवळीमागे अपेक्षीत असलेली बांधिलकी यांच्या त्यांना कितपत देणेघेणे असेल हा प्रश्नच आहे.

महाराष्ट्रातला सहकार रुजला वाढला, त्याला पहिल्या पिढीतले अनुभव, परिश्रम कारणीभूत होते. हे नेतृत्व स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यातून तयार झाले होते. अपवाद वगळता कॉंग्रेसचा विचार प्रमाण मानत होते. पंडित नेहरूंचा, समाजवादी विचारांचा प्रभाव त्यातल्या बहुतेक नेत्यांवर होता. पश्‍चिम महाराष्ट्रातले हे नेते बहुजन मराठा समाजातले होते. ते कसे बदलत गेले. सत्तेच्या सावलीत सरंजामीवृत्तीचे बनत गेले. त्यांची मुले तर राजे आणि युवराज बनले. त्याचे सविस्तर, खोलवरचे चित्रण रंगनाथ पठारे यांच्या ताम्रपट कादंबरीत दिसून येते. राजकारण्यांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीचे सैरभैर होणे, त्यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणे आणि त्यात ते किती आणि कसे टिकून उभे राहतात हे पाहणे म्हणजे तिसरा सामना आहे.

तिसरा सामना हा सहकार सम्राटांच्या तिसरी,चौथी पिढीसाठी महत्वाचा आहे. त्यांच्या वडिलांनी सत्तेसाठी जे राजकारण केले, त्याची फळेही त्यांना भोगावी लागत आहेत. महाराष्ट्रात शरद पवारांना सहकाराचे, साखर कारखानदारांचे नेते आजही मानले जाते. खुद्द पवारांच्या कुटुंबात सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यानंतर तिसऱ्या पिढीचे युवा नेते पार्थ पवार राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्या आक्रमकपणामुळे खुद्द जाणत्या राजाला दोन पावले मागे यावे लागले.

कोकणात नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याला निलेश व नितेश या पुत्रांची राजकीय सोय लावता लावता स्वतः अस्तित्व कसे राखावे असा प्रश्न भेडसावतो आहे. नेहरू, गांधी घराण्याची पुण्याई राहुल गांधी यांच्या उपयोगाला येत नाही. तशीच अवस्था जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरल्या सहकारसम्राट, शिक्षणसम्राट, पुढील पिढीची सोय लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या घरंदाज नेत्यांची झाली आहे. त्यांची फरफट, धोरसोडपणा करूणाजनक आणि शोकान्त वाटावा असा आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.