मेन स्टोरी : तिसरा शोकान्त सामना (भाग १)

जयसिंग पाटील (लेखक ज्येष्ठ पत्रकार, माध्यम अभ्यासक, नाट्यलेखक व कादंबरीकार आहेत.)

महाराष्ट्रातला सहकार रुजला वाढला, त्याला पहिल्या पिढीतले अनुभव, परिश्रम कारणीभूत होते. हे नेतृत्व स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यातून तयार झाले होते. अपवाद वगळता कॉंग्रेसचा विचार प्रमाण मानत होते. पंडित नेहरूंचा, समाजवादी विचारांचा प्रभाव त्यातल्या बहुतेक नेत्यांवर होता. पश्‍चिम महाराष्ट्रातले हे नेते बहुजन मराठा समाजातले होते. ते कसे बदलत गेले. सत्तेच्या सावलीत सरंजामीवृत्तीचे बनत गेले. त्यांची मुले तर राजे आणि युवराज बनले. त्याचे सविस्तर, खोलवरचे चित्रण रंगनाथ पठारे यांच्या ताम्रपट कादंबरीत दिसून येते. राजकारण्यांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीचे सैरभैर होणे, त्यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणे आणि त्यात ते किती आणि कसे टिकून उभे राहतात हे पाहणे म्हणजे तिसरा सामना आहे.

सामना हा 1974च्या दरम्यानचा गाजलेला मराठी सिनेमा. सहकार चळवळीतून उदयाला आलेले सत्ताकांक्षी नेतृत्व, त्याची अघोषित दहशत आणि एक फाटका मद्यपानाच्या आहारी गेलेला खादीधारी यांच्यातला हा संघर्ष. निळू फुले यांचा हिंदुराव धोंडे पाटील आणि श्रीराम लागू यांचा मास्तर. दोन्ही भूमिका तोडीसतोड. हा एक वेगळाच सामना होता. तत्कालिन तमाशापटांपेक्षा वेगळा. नाटककार विजय तेंडुलकर यांची पटकथा आणि संवादाने हा सामना वेगळा ठरला. आजही त्याचा ताजेपणा संपलेला नाही. हा चित्रपट आला तेव्हा देशाची वाटचाल आणीबाणीच्या दिशेने सुरू होती. इंदिरा गांधी यांचे एककेंद्री नेतृत्व सत्तेवर विराजमान होते.

यशवंतराव चव्हाण केंद्रसरकारमध्ये मंत्री होते. महाराष्ट्राच्या राजकारणावरील त्यांची पकड सुटलेली नव्हती. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांच्याबरोबरीचे किंवा त्यांचा आदेश प्रमाण मानून कार्य करणारे नेते, कार्यकर्ते जिल्हा, तालुका किंवा गाव पातळीवर सहकारी संस्थांच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यानी तळपत होते. हे नेतृत्व सरंजामीवृत्तीचे बनत गेले. त्याचीही एक दहशत गावागावातून निर्माण झाली. नेतृत्वाची पहिली पिढी सर्वसामावेश विचार करणारी, विकासाचा ध्यास असलेली अशी होती. शेतकरी वर्गाचे किमान जीवनमान उंचावण्याचा या नेतृत्वाने प्रयत्न केला. सिंचन, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात पायभूत असे काम केले. मात्र लवकरच त्यांच्या संस्थांचे संस्थान झाले. ते, त्याचे कुटुंबीय संस्थानिक, जाहागीरदार बनले. जब्बार पटेल यांच्या सामना मध्ये काहीप्रमाणात वास्तव चित्र येते.

दुसरा सामना लिहला तो नाटककार सतीश आळेकर यानी. विजय तेंडुलकर यांचा पुढचा सामना त्यांनी नाटकाच्या रुपाने मांडला. 1989च्या दरम्यान मराठी रंगभूमीवर आलेला हा सामना हिंदुराव धोंडे पाटील यांच्या पुढच्या पिढीचा होता. हा सामना फार रंगला नाही. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तिसरा सामना दिसतो आहे, अधिक करुणाजनक, शोकान्त आहे. सहकार सम्राटांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीची सैरभैर अवस्था त्यातून दिसते आहे. हे नेतृत्व मागील पिढ्यापेक्षा वेगळे आहे. त्याची कोंडी, त्याचे दिशाहीन होणे सुद्धा वेगळे आहे. या सगळ्या नेतृत्वाची पाळेमुळे कॉंग्रेस संस्कृतीत रुजली आहेत. कारणे कोणतीही असोत, त्यातील बहुतेकांनी स्वतःला मुळांपासून उखडून घेतले आहे. नेहरू, गांधी घराण्याचा वारसा पुढे चालवणारे राहुल गांधी आणि महाराष्ट्रातले छोटे सुभेदार यांची अवस्था थोड्याफार फरकाने सारखीच आहे. त्याची काही ठळक उदाहरणेच बघू या.

संस्थान सांगली. मूळ राजे पटर्वधन. पण हा जिल्हा देशात ओळखला जातो ते वसंतदादा पाटील यांच्या नावाने. दादा धडाडीचे नेते. स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यातून त्यांची जडणघडण झालेली. तुरूंगातून त्यांनी मारलेली उडी हा तर दंतकथेसारखा लोकांच्या तोंडी असलेला विषय. सत्ता आणि सहकाराच्या माध्यमातून दादांनी मोठे विकासाचे काम उभे केले. सांगली साखर कारखाना आशिया खंडात गौरविला गेला. दादा पाटबंधारे मंत्री झाले. मुख्यमंत्री झाले. राजस्थानचे राज्यपाल झाले. फक्त सातवी शिक्षण झालेले दादा मंत्रालयातल्या सचिवांनाही चळचळा कापायला लावत. त्यांचा अभ्यास मोठा होता. जनसामान्यांशी असणारे त्यांचे नाते जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे होते. लोकांनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. यशवंतराव चव्हाण यांच्याइतकेच दादांचे नेतृत्व स्वयंभू होते.

पंडित नेहरू अठरा वर्षे पंतप्रधान होते. त्यांच्या हयायतील तीन निवडणुका झाल्या. त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक सहकारी स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आलेले होते. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक सहकारी वयाने जेष्ठ होते. अनुभवाने सत्तेच्या सावलीला ते सुखावले होते. इंदिरा गांधीनी हळहळू त्यांच्या सत्तेखाली सुरूंग पेरण्यास सुरवात केली. मोरारजी देसाई, जगजीवनराम यांसारखे नेते बाहेर पडले. कॉंग्रेसमधल्या बुढ्ढाचाऱ्यांना दूर करणे हा इंदिराजींच्यासाठी मोठा संघर्ष होता. त्यात त्या यशस्वी ठरल्या

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.