Hathras stampede – हाथरसमधील सत्संगमध्ये चेंगराचेंगरीत प्रकरणातील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरला उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. तसेच अन्य दोघा संशयितांवरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये त्याला एसटीएफ आणि एसआयटीच्या टीमकडे सोपवण्यात आले आहे. त्याचा कबुलीजबाब घेतला जाणार आहे. तसेच त्याचा राजकीय पक्षासोबत संबंध असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवप्रकाश मधुकरने दिल्ली पोलिसंकडे आत्मसमर्पण केले आहे. तो नजफगडच्या रुग्णालयात दाखल होता. दिल्लीत तो उपचार घेत असल्याने त्यांनी तेथील पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी देवप्रकाश मधुकर याचा ECG केल्यानंतर त्याचा हा रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर एपी सिंहने पोलिसांना याबाबत सूचना दिली.
बाबा साकार हरि विश्व याने सर्वोच्च न्यायालयाचे वकील एपी सिंह यांना वकिलपत्र दिले आहे. सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत समाजकंटकांचा हात असल्याचा दावा बाबांनी केला आहे. तसेच, आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एपी सिंग यापूर्वी निर्भया प्रकरण आणि सीमा हैदर या प्रकरणाचे खटले लढवले आहेत.
देवप्रकाश मधुकर हा उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील शितलपूर ब्लॉकमध्ये तांत्रिक सहाय्यक पदावर काम करत होता. पण अटक करण्यापूर्वी त्याला या पदावरून हटवण्यात आले आहे. 2010 पासून देवप्रकाश मधुकर 20 पंचायतींमधील मनरेगाच्या कामांवर देखरेख करत होता. एफआयआरमध्ये मधुकरचे नाव मुख्य आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. हाथरस पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. दरम्यान, यापूर्वी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.