मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काही अज्ञान व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली होती.
यावेळी अज्ञातांनी घराच्या काचांवर दगडफेक केली होती. तसेच या हल्ल्यात राजगृहातील कुंड्यांचेही नुकसान झाले होते. या प्रकरणी उमेश जाधव या आरोपीला 9 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज (बुधवार) विशाल मोरे नावाच्या मुख्य आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
राजगृहावरील हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून त्या घटनेचा निषेध करण्यात आला होता. तसेच पोलिसांनीही त्वरित घटनास्थळाची पाहणी करत तपासाला सुरूवात केली होती. सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि गुप्त बातमीदारांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर या प्रकरणातील प्रमुख आरोपी विशाल मोरे याला आज (बुधवार) अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.