पुणे – दहा लाख रुपयांची खंडणी मागत ती न दिल्यास हॉस्पिटलच्या आवारात बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा ई मेल नोबेल हॉस्पिटलच्या मेलवर आला आहे. यामुळे हॉस्पिटल प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान बीडीडीएसच्या पथकाने हॉस्पिटलचा सर्व परिसर पिंजून काढला, मात्र त्यांना कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने मेल पाठवणाऱ्याची माहिती हडपसर पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नोबल हॉस्पिटलला एक मेल आला. तुम्ही मला दहा लाख रूपये द्या अन्यथा हॉस्पिटलच्या आवारात बॉम्ब ठेवण्याची धमकी यामध्ये देण्यात आली होती.यामुळे हॉस्पिटल प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर प्रशासनाने याबाबतची माहीती तातडीने पोलिसांना दिली. घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी तातडीने बीडीडीएसच्या पथकाला पाचारण केले. रात्री दोन वाजेपर्यंत तसेच पहाटेही हॉस्पिटलच्या परिसराची पहाणी करण्यात आली.
हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने माहिती देताना डॉ.साळे यांनी सांगितले, आम्ही रुग्णांच्या फिडबॅकसाठी एक वेबसाईट तयार केली आहे. यामध्ये बरे झालेले रुग्ण त्यांचा फिडबॅक देतात. या वेबसाईटवर खंडणी मागणारा मेल आला होता. हा मेल आयडी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याने तातडीने याची माहिती आम्हाला दिली. आम्ही मेल तपासल्यावर हडपसर पोलिसांना त्यांची माहिती देण्यात आली.
– डॉ.एच.के.साळे
तक्रार अर्ज प्राप्त झाल्याने तातडीने पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. बीडीडीएस पथकाच्या मदतीने शोध घेण्यात आला. तसेच पाठवलेल्या मेलची सायबर तज्ञांच्या मदतीने माहिती घेण्यात येत आहे.
– रमेश साठे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)