पुणे, दि. 11 – घरकाम करत असलेल्या ठिकाणचे चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेणाऱ्या मोलकरणीसह दागिने घडविणाऱ्या एका कारागिराला पोलिसांनी अटक केली.
सुनीता लष्करे (वय 30, रा. वडारवस्ती, येरवडा), खालीद सय्यद ऊर्फ बच्चू (वय 38, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संदिप कुलदिपकुमार ठुसू (वय 33, रा. कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठुसू यांच्याकडे काही महिन्यांपासून एक महिला घरकाम करण्यासाठी येत होती. मात्र काही दिवसांपासून ती कामवर येण्यास अचानक थांबली. फिर्यादी व त्यांच्या पत्नीस संशय आल्याने त्यांनी घरातील दागिने व पैशांची तपासणी केली. त्यावेळी घरातील चार लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार, त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेस ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर तिच्याकडील चोरलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी एक जोड सोन्याचे कानातील झुमके, एक सोन्याची अंगठी व चांदीची नाणी पोलिसांनी जप्त केली. तर उर्वरीत सोने तिने सोन्याचे दागिने घडविणाऱ्या खालीद सय्यद या कारागिराकडे दिल्याचे सांगितले.
त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने संबंधित महिलेकडून ते दागिने विकत घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्याकडून काही दागिने जप्त केले. त्यानुसार, पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर करपे यांचे पथक करीत आहे.