मेहुण्यांनीच केला मेहुण्याचा खून; आरोपींना अटक

संगमनेर: संगमनेर तालुक्‍यातील वडझरी खुर्द शिवारात खून करून मृतदेह दगडखाणीत टाकण्यात आला होता. या मृत व्यक्तीची ओळख पटली असून, सुभाष शांताराम काळे (वय 35) असे नाव आहे. त्यांच्या दोन मेहुण्यांनीच त्यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले असून, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संगमनेर तालुक्‍यातील वडझरी खुर्द शिवारातील दगडखाणीत बुधवारी (दि. 1) दुपारी दीडच्या सुमारास कुजलेल्या स्थितीत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला होता. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्याचे अवघड काम होते. मात्र पोलिसांनी त्यात यश मिळविले. खून झालेल्या युवकाचे नाव सुभाष शांताराम काळे (वय 35, रा. धांदरफळ खुर्द, हल्ली रा. मालुंजकर चौक, मालदाड रोड, घुलेवाडी) असे असल्याचे निष्पन्न झाले.

मेहुणा बहिणीला त्रास देत होता, शिवीगाळ करीत होता. या कारणास्तव बहीण एक महिन्यापासून माहेरी आहे, याच कारणावरून चुलत मेहुणा राहुल रावसाहेब हासे (वय 23 ) व सख्खा मेहुणा अमर शिवाजी हासे (20, रा. राजापूर) यांनी त्यांचे मेहुणे सुभाष काळे यास दारू पिलेल्या अवस्थेत सोमवारी (दि. 29 ) मोटारसायकलवर बसवून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वडझरी खुर्द शिवारातील दगडखाणीजवळ आणले. त्याठिकाणी सुभाष काळेच्या डोक्‍यात दगड टाकून खून केला. तसेच मृतदेह दगडखाणीत टाकून दुचाकीवरून दोघेही पसार झाले.

उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवीत राजापूर येथील घरातून दोघाही आरोपींना ताब्यात घेतले. रात्री उशिरा आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील, तसेच संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने अवघ्या तीन दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.