महू- हातगेघर धरणग्रतांचे प्रश्‍न तात्काळ मार्गी लावा

माधव भांडारींचे अधिकाऱ्यांना आदेश : दौऱ्यानंतर अहवाल सादर करा 

सातारा – महू- हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे आदेश पुनर्वसन प्राधिकरणचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर खंडाळा व फलटण तालुक्‍यांतील गावठाणच्या जागांचा संयुक्त दौरा करून अहवाल सादर करण्याचे देखील आदेश भांडारी यांनी दिले.

जावळी तालुक्‍यातील महू- हातगेघर धरणग्रस्तांचे रखडलेल्या प्रश्‍नांसाठी बैठकीचे आयोजन पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी भंडारी बोलत होते. त्यावेळी विभागीय पुनर्वसन आयुक्त दीपक नलवडे, जनजागर प्रतिष्ठानचे माधव कुलकर्णी, राज्य समन्वयक देवराज देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी रूपाली आवळे, सातारा प्रांताधिकारी स्वाती देशमुख, फलटण प्रांताधिकारी संतोष जाधव, जावली तहसीलदार रोहिणी आखाडे, सुनील शिंदे, हणमंत कंक, जगन्नाथ विभुते, जितेंद्र पाटील, सुनील चव्हाण, बाबा पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्रीहरी गोळे यांनी महू- हातगेघर धरणग्रस्तांच्या विविध समस्या मांडल्या. त्यामध्ये पात्र प्रकल्पग्रतांच्या संकलन याद्या अद्ययावत करून 15 दिवसांत अंतिम निर्णय घेऊन त्यांना पुनर्वसनाचा लाभ देणे, पुनर्वसनाच्या लाभक्षेत्रातील देय जमिनी ज्यांचे निवाडे झालेले आहेत, अशा सात- बारास अंमल न झालेल्या जमिनींचे प्रकल्पग्रतांना वाटप करणे, कोळकी ता.फलटण येथील गावठाणात संपूर्णपणे हातगेघर येथील प्रकल्पग्रतांचे गावठाण भूखंड वाटप करून संपूर्ण नागरी सुविधा देणे, अजनुज, मिरजेवाडी, आहिरे ता.खंडाळा व कोळकी, बरड, बडेखान ता.फलटण येथे कृष्णा खोरे उपअभियंता व जनजागर प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक देवराज देशमुख व श्रीहरी गोळे यांचा संयुक्त दौरा करून गावठाणांच्या सर्व नागरी सुविधा पूर्ण करण्यासाठी शासनास अहवाल सादर करणे. त्याचबरोबर हातगेघर येथे शासनाच्या (कृष्णा खोरे ) खर्चाने उपसासिंचन योजना राबविण्यासाठी स्थळ पाहणी करून संबंधित विभागास अहवाल पाठविण्यात यावा.

महू, वहागाव, पानस व इतर ठिकाणच्या प्रकल्पग्रत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या बदली प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करावी. महू-हातगेघर धरणांच्या सांडव्यातील बाधित शेतकऱ्यांची संकलन यादीत सामावेश करून त्यांना पुनर्वसनाचा लाभ द्यावा. तसेच ज्या प्रकल्पग्रतांची एक एकर जमीन वाटपातून वगळली आहे. त्यांचे शिल्लक क्षेत्र एक हेक्‍टरपेक्षा जास्त पिकाऊ जमीन नसल्यास त्याचा सर्व्हे करावा व पडीक क्षेत्र असल्यास वगळलेली एक एकर जमिनींचे वाटप पुन्हा करावे.

वारस नोंद, अर्धवट राहीलेले उदरनिर्वाह भत्ते, लाभक्षेत्रातील जमिनींच्या मूळ मालकांचे चुकीचे बदली प्रस्ताव रद्द करणे व एक महिन्याच्या आत पुन्हा सर्व विषयांचा आढावा घेण्यात यावा, अशा विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे आदेश भंडारी यांनी दिले. बैठकीस अशोक गोळे, विश्‍वास रांजणे, सुभाष गुजर, दीपकशेठ गावडे, विशाल सकपाळ, सुरेश भांदिर्गे, दत्तात्रय रांजणे, मोतीराम गुरव, नितीन रांजणे, वनिता गोळे, नवीनचंद्र गोळे, किसन गोळे आदी धरणग्रस्त उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.