वाहन विक्री वाढत नसल्यामुळे महिंद्राकडून उत्पादनात कपात

नवी दिल्ली – बाजारपेठेतील मागणी कमी असल्यामुळे अनेक मोटार कंपन्यांनी उत्पादन कपात जाहीर केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आपल्या विविध उत्पादन केंद्रामध्ये तेरा दिवस उत्पादन बंद ठेवणार आहे.
कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या तिमाहीत 5 ते 13 दिवस उत्पादन बंद ठेवण्यात येईल. कंपनीच्या कृषी उपकरणे आणि स्वयंचलित वाहन विभागातील कारखान्यात हे उत्पादन कमी करण्यात येणार आहे.

बाजारपेठेतील मागणीनुसार पुरेशी उत्पादने अगोदरच उपलब्ध करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या उत्पादन कपातीचा ग्राहकांच्या सध्याच्या मागणीवर कसलाही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

गेल्या महिन्यात मारुती सुझुकी इंडिया कंपनीने गुडगाव आणि मानेसर येथील उत्पादन एक दिवस बंद ठेवले होते. सध्या मागणी कमी असल्यामुळे वाहन उत्पादकांच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे मागणी वाढत नाही तोपर्यंत या कंपन्यांना पूर्णक्षमतेने उत्पादन करता येणार नाही. एप्रिल महिन्यात वाहन विक्री 17 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. आठ वर्षात प्रथमच एखाद्या महिन्यात वाहन विक्रीत एवढी मोठी घट झालेली आहे. भांडवल सुलभतेचा अभाव आणि इतर कारणांमुळे वाहन विक्री कमी होत असल्याचे बोलले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.