महिंद्राने 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

भविष्यात आणखीन कर्मचाऱ्यांची जाऊ शकते नौकरी

नवी दिल्ली – जगभरात पुन्हा एकदा मंदीचे ढग दाटू लागले असून त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू लागल्याचे दिसत आहे. यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये खळबळ उडाली असून देशातील मारुती सुझुकी, अशोक लेलॅंडने कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली असताना आता महिंद्रानेही यामध्ये उडी घेतली आहे. महिंद्राने 1 एप्रिल पासून तब्बल 1500 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले असल्याची माहिती कंपनीचे संचालक पवन गोयंका यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशातील ऑटोमोबाईल्स सेक्‍टरला गेल्या 19 वर्षांतील सर्वात मोठा फटका बसला आहे. त्यांच्या उत्पादना सोबतच विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. ही घट 18.71 टक्के इतकी आहे. यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांत ऑटो सेक्‍टरमधील लाखो नोकऱ्या गेल्या आहेत. कर्नाटकमधील टोयोटा प्लॅंटमध्येही इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनरचे उत्पादन कमी करण्यात आल्याचे वृत्त आहे. तर, जमशेदपूरमध्ये टाटा मोटर्सने उत्पादन घटविले आहे. यामुळे या कंपनीला स्पेअर पार्ट पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी टाळे ठोकले आहे. त्यामुळे जवळपास 30 कंपन्या बंद झाल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती इन्शुरन्स, सेवा आदी क्षेत्रात निर्माण झाली आहे. ऑटोमोबाईल सेक्‍टरशी जोडधंद्यांमध्ये सुमारे 5 लाख नोकऱ्या धोक्‍यात आल्या आहेत.

त्यातच महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने कर्मचारी कपात सुरू केली आहे. व्यवस्थापकीय संचालक पवन गोएंका यांनी कोलंबोमध्ये सांगितले की, कंपनीने 1 एप्रिलपासून जवळपास 1500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एवढे करूनही जर मंदी सुरूच राहिली तर आणखी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. फॅक्‍टरीतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांपेक्षा डीलर आणि सप्लायरच्या कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याचा जास्त धोका आहे. भारतातील पुढील उत्सवी सिझन वाहन उद्योगासाठी खूप महत्वाचा आहे. अन्यथा याचा नकारात्मक परिणाम नोकरी आणि गुंतवणुकीवर होणार असल्याचा इशारा गोएंका यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)