सात पंचायत समितींमध्ये येणार महिलाराज

पारनेर, नेवासा, शेवगाव खुल्या प्रवर्गासाठी, नगर, कर्जत, संगमनेर, राहाता महिलांसाठी राखीव

नगर – जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात पारनेर, नेवासा व शेवगाव या तीन पंचायत समिती खुल्या प्रवर्गासाठी, तर नगर तालुका, कर्जत, संगमनेर व राहाता या चार पंचायत समित्या खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या. पाथर्डी व अकोले नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, तर राहुरी व श्रीरामपूर पंचायत समित्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाला. श्रीगोंदा अनुसूचित जाती, तर कोपरगाव अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाला. जामखेड पंचायत समिती एकमेव अनुसूचित जमातीसाठी राखीव झाली. मात्र,येथे या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात येईल.

आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार सोडत सुमारे पाऊणतास उशिरा सुुरु झाली. यावेळी महसूलच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी आरक्षण सोडत पध्दतीची माहिती दिली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार वैशाली आव्हाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके आदी उपस्थित होते.

पंचायत समित्यांमध्ये सभापतिपदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांकरीता आरक्षण निश्‍चित करावयाचे होते. त्यासाठी एकूण 14 सभापती पदांपैकी अनुसूचित जाती – एक, अनुसूचित जाती महिला – एक, अनुसूचित जमाती – एक, नागरीकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्‍या जमातीसह) – दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (विमुक्त जाती व भटक्‍या जमातीसह) – दोन, सर्वसाधारण – तीन आणि सर्वसाधारण महिला – चार अशा पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली. रिदीमा नागेश साहिवाले या तीन वर्षाच्या मुलीने आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या.

प्रथम अनुसूचित जातीच्या दोन जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यात सदर लोकसंख्येच्या निकषावर अनुसूचित जातीसाठी श्रीगोंदा व कोपरगाव तालुका आरक्षित करण्यात आला. त्यात महिला प्रवर्गासाठी चिठ्ठी टाकल्यानंतर कोपरगावचे आरक्षण निघाले. त्यामुळे कोपरगाव पंचायत समिती महिला अनुसूचित जाती,तर श्रीगोंदा खुल्या अनुसूचित जातीकरिता राखीव करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात लोकसंख्येच्या आधारावर जामखेडचे आरक्षण निघाले. मात्र, जामखेडमध्ये या प्रवर्गाचा उमेदवारच नसल्याने त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय शासनाचे मार्गदर्शन मागवणार आहे.

अनुसूचित जमातीनंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात लोकसंख्येच्या निकषावर कर्जत, अकोले, श्रीरामपूर, राहाता, पाथर्डी व नगर तालुका या सहा पंचायत समितीची निवड करण्यात आली. यात निकषाप्रमाणे राहुरीला आतापर्यंत महिला राखीव आरक्षण नसल्यामुळे ते देण्यात आले. तर चिठ्ठीद्ववारे श्रीरामपूर महिलांसाठी राखीव निघाल्याने अकोले व पाथर्डी नागरिकांच्या मागास प्रवर्ग खुल्या गटासाठी राखीव झाले. शेवटी खुल्या गटाची आरक्षण सोडत काढण्यात आली.

यात संगमनेर, पारनेर, नेवासा, शेवगाव, राहाता, नगर व कर्जत हे सात तालुके शिल्लक होते. त्यात परत चार जागा महिलांसाठी राखीव होत्या. यात रोटेशनप्रमाणे संगमनेर, राहाता व नगर तालुका महिलांसाठी राखीव करण्यात आले. तर उर्वरीत पारनेर, शेवगाव, नेवासा व कर्जत तालुक्‍यातून एक चिठ्ठी काढली असता त्यात कर्जतची चिठ्ठी निघाल्याने कर्जत खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले. तर, पारनेर, शेवगाव व नेवासा या तीन पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राहिले. यावेळी नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, राजेंद्र गुंड, पारनेरचे सभापती दिपक पवार, शहाजी हिरवे, अमोल साळवे, बाबाजी चौधरी, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, गुलाब शिंदे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.