सभापतिपदी मोनिका हरगुडे, उपसभापतिपदी सविता पऱ्हाड यांची बिनविरोध निवड
शिरुर (प्रतिनिधी) – शिरूर पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोनिका हरगुडे व उपसभापतिपदी सविता पऱ्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे निर्वीवाद वर्चस्व आहे. यंदाचे सभापतिपद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता राखीव होते.
सध्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येत असणाऱ्या शिरुर तालुक्यातील कारेगाव पंचायत समिती गणातून निवडून आलेले विश्वासराव कोहोकडे हे विद्यमान सभापती होते. आरक्षणानुसार सर्वसाधारण महिलाकरिता सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता होती. सध्या पंचायत समितीत पक्षीय बलानुसार राष्ट्रवादीचे 8, भाजप 3, लोकशाही क्रांती आघाडी 2 व शिवसेना 1 असे बलाबल आहे. उपसभापतिपदाकरिता सविता पऱ्हाड व घोडे यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत घोडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
सभापतिपदाकरिता मोनिका हरगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्या सणसवाडी गणातून निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्यांनी पंचायत समितीत उपसभापती म्हणून काम केले आहे. उपसभापती पऱ्हाड या केंदूर गणातून निवडून आलेल्या आहेत. यावेळी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार आमदार ऍड अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, कुसुम मांढरे, केशर पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, खरेदी- विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, दत्तात्रय हरगुडे, प्रकाश पवार, राजेंद्र गावडे, सदाशिव पवार, मुज्जफर कुरेशी, नागरिक उपस्थित होते. आमदार अशोक पवार म्हणाले की, पंचायत समितीच्या माध्यमातून नूतन पदाधिकारी तालुक्याचा विकासाला गती देतील. सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतील.
निवडणूक अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना दम
शिरूर पंचायत समिती येथे सभापती व उपसभापती पदाची निवडणूक असल्याने वार्तांकनासाठी पत्रकार तिथे गेले होते. त्यावेळी निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष देशमुख यांनी पत्रकारांना बैठकीचे हॉलमध्ये येण्यास मज्जाव करून जास्त बोलून माझे डोके फिरवू नका, नाहीतर बघा, असा सज्जड दम दिला. अशा उर्मट अधिकाऱ्यांच्या शिरूर तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.