चेन्नई संघाच्या काशीविश्वनाथन यांचा खुलासा
चेन्नई – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणखी किमान दोन वर्षे आयपीएल तसेच स्पर्धात्मक क्रिकेट खेळू शकेल, असा खुलासा आयपीएलमधील बलाढ्य चेन्नई सुपर किंग संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशीविश्वनाथन यांनी केला आहे. या संदर्भात गेले दोन दिवस विविध माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते, त्यामुळे काशीविश्वनाथन यांनी स्पष्टीकरण दिले.
धोनी कधी पुनरागमन करणार किंवा निवृत्ती घेणार, असे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, आम्हाला ती चिंता नाही. धोनीचा फिटनेस पाहिला तर असे लक्षात येते की तो पूर्ण फिट असून पुढील किमान दोन मोसम तरी सहज खेळेल. केवळ आयपीएलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेटही तो खेळेल, असेही त्यांनी सांगितले.
सध्या धोनी रांचीत असून झारखंड क्रिकेट संघटनेच्या परवानगीने वैयक्तिक सराव करीत आहे. त्याला आयपीएल खेळण्याची इच्छा आहे तसेच राष्ट्रीय संघात पुनरागमनही करण्याची जिद्द आहे. त्याची तंदुरूस्ती कोणत्याही स्तरावरील क्रिकेटसाठी परिपूर्ण आहे. त्यामुळे इतक्यात निवृत्ती घेण्याचा विचारही त्याच्या मनात येणार नाही. तो यंदा अमिरातीत होत असलेल्या आयपीएलमध्ये सहभागी होत भविष्यात भारतीय संघातही पुनरागमन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला व त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले होते. त्यानंतर आतापर्यंत धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. त्याने विश्रांती घेतली होती व त्यावेळी तत्कालीन निवड समितीने आयपीएल किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरस कामगिरी केल्यास भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळेल, असे सांगितले होते.
येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होत असलेल्या आयपीएलमध्ये सरस कामगिरी करून संघात पुनरागमन करण्याची धोनीला संधी मिळालेली आहे.