पुणे -पहिल्या महेंद्र पेशवे स्मृती टेनिस स्पर्धेत पुण्यातील संदीप बुलंदी व डॉ. प्रदीप कुंचूर यांनी तर, अमित किंडो आणि चन्ना कुमार या जोडीने आपापल्या गटाचे विजेतेपद संपादन केले.
कर्वेनगर येथील नवसह्यांद्री टेनिस कोर्टवर नुकत्याच झालेल्या या स्पर्धेच्या वरिष्ठ गटामध्ये संदीप बुलंदी आणि डॉ. प्रदीप कुंचूर या जोडीने श्री उल्हाळकर आणि डॉ. भागवान यादव या जोडीचा 6-0, 6-0 असा पराभव करून या गटाचे विजेतपद संपादन केले.
अन्य गटात अमित किंडो आणि चन्ना कुमार या जोडीने उमेश भिडे आणि आदित्य जोशी या जोडीचा 4-6, 6-4, 11-9 असा सुपर टायब्रेकमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
महेंद्र पेशवे यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1963 रोजी झाला होता. महेंद्र पेशवे हे श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे नववे वंशज होते. कोविड काळात 20 एप्रिल 2021 रोजी महेंद्र पेशवे यांचे निधन झाले. त्यांना टेनिसची आवड होती. गेली 6 वर्षे ते नियमितपणे नवसह्यांद्री क्रीडा संकुलामध्ये नियमित टेनिस खेळण्यास येत असत. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही टेनिस स्पर्धा आयोजित केली गेली होती.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयकर विभागाचे मुख्य आयुक्त यशवंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके आणि करंडक देण्यात आले. यावेळी महेंद्र पेशवे यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच डॉ. उदय कुलकर्णी आदी उपस्थित होते. महेंद्र पेशवे यांचे अनुभव आणि त्यांच्या सहकारी टेनिस गटातील खेळाडूंशी असलेले संबंध याबद्दलची छोटी पुस्तिका पेशवे कुटुंबाला सादर करण्यात आली.