पुरंदरवर महायुतीचाच झेंडा फडकणार – बाबाराजे जाधवराव

शिवतारेंच्या प्रचारार्थ सासवड येथे महायुतीची पदयात्रा

सासवड – पुरंदर विधानसभा मतदारसंघावर महायुतीचाच झेंडा फडकणार असून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजयी होतील, असा विश्‍वास बाबाराजे जाधवराव यांनी व्यक्‍त केला.

पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवर राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. 14) सासवडमध्ये महायुतीच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली होती, त्यावेळी जाधवराव बोलत होते.

यावेळी विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष पंडितराव मोडक, आरपीआयचे विष्णू भोसले, तालुका अध्यक्ष पंकज धिवार, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप, नगरसेवक सचिन भोंगळे, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य गिरीश जगताप, कुंडलिक जगताप, युवासेनेचे तालुका अध्यक्ष मंदार गिरमे, शिवसेनेचे शहरप्रमुख अभिजीत जगताप, भाजपचे शहराध्यक्ष साकेत जगताप, नगरसेवक अस्मिता रणपिसे, डॉ. राजेश दळवी, शिवतारे यांच्या कन्या डॉ. ममता शिवतारे-लांडे, अनिल जगताप यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी संपूर्ण शहरात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.

जालिंदर कामठे म्हणाले की, महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवतारे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करतील. विरोधी आमदार निवडून दिल्यास तालुका पुन्हा विकासापासून वंचित राहील. कॉंग्रेसला सासवड शहरात गटर करायला 20 वर्षे लागली. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या योजना एक किंवा दोन आठवड्यात मार्गी लागतात, त्यामुळे सासवडला पिण्यासाठी वीरमधून पाणी आणल्याचा कॉंग्रेसकडून केला जाणारा प्रचार हा दिशाभूल करणारा आहे. त्यात कॉंग्रेस पक्षाचा काडीमात्र संबंध नाही असे त्यांनी नमूद केले.

संजय जगताप संपत्ती कधी दान करणार?
गुंजवणीचे पाणी अडवण्यात माझा संबंध असल्याचे पुरावे दिल्यास सगळी संपत्ती दान करेल, असे संजय जगताप यांनी सांगितले होते. शिवतारे यांनी याबाबतचे पुरावे भर पत्रकार परिषदेत सादर केले. लवकरच ते घराघरांत देखील आम्ही देणार आहोत. संजय जगताप आता सगळी संपत्ती दान कधी करणार का, असा सवाल जालिंदर कामठे यांनी उपस्थित केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.