हडपसर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुती सरकारने सर्वाधिक वेगाने सर्व निर्णय घेतले.राज्यात अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या. शेतकरी, महिला,ज्येष्ठ, शाळकरी विद्यार्थी ते उद्योजक आणि इतर तरुणांना या योजनांचा लाभ होतो आहे त्यामुळे या सर्व गोष्टीची जाणीव मतदार ठेवतील आणि यामुळेच सर्वाधिक जागांवर महायुती विजयी होईल,असा विश्वास शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी व्यक्त केला.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोगावले बोलत होते. यावेळी कर्नाटकचे आमदार प्रताप कुमार गौडा, आमदार योगेश टिळेकर, शिवसेना जिल्हा अध्यक्ष उल्हास तुपे, माजी नगरसेवक मारुती तुपे, हडपसर विधानसभा प्रमुख अभिमन्यू भानगिरे, अभिजीत बोराटे, संजय लोणकर, डॉ.शंतनु जगदाळे, सविता घुले, मनोज घुले, खन्नासिंग कल्याणी, संतोष रजपूत आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच खासकरून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आमदार योगेश टिळेकर म्हणाले की महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांना निवडून आणण्याकरिता आम्ही कंबर कसली आहे. हडपसर भागात मी असेल,चेतन तुपे आणि नाना भानगिरे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालेली आहेत. यानंतर राज्यात महायुतीची सरकार येण्याकरीता चेतन तुपे यांच्या घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून दुसऱ्यांदा मतदारांनी निवडून द्यावे.
तर शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये विकास कामे करून मतदारांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सर्व सामान्य नागरिकांचा विकास करण्याकरिता त्यांनी अनेक योजना आणल्या आहेत. त्याप्रमाणे हडपसर भागात तीनशे कोटी रुपयांचा निधी देऊन विकास कामे करण्याला चालना दिली आहे. त्यामुळे चेतन तुपे यांना दुसऱ्यांदा निवडून देऊन आपल्याला हडपसरचा एक नवा इतिहास रचायचा आहे.
चेतन तुपे म्हणाले की हडपसर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली विकासकामे अधिक गतिमान करण्यासाठी महायुतीचे घड्याळ निवडून द्या, इथला मातीतील उमेदवार, जनतेच्या सुख दुःखाशी समरस होणारा, प्रत्येक वेळी उपलब्ध असणारा उमेदवार हडपसरकरांना आमदार म्हणून हवा आहे.