महायुती 200 जागांच्या पार जाणार नाही – मनोहर जोशी

मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुती 200 जागांच्या पार जाणार नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेना-भाजपला घरचा आहेर दिला आहे. मनोहर जोशी यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला, त्यावेळी ते बोलत होते.

मनोहर जोशी म्हणाले, निवडणुकीतील भविष्य कुणीही अचूक सांगू शकत नाही. महायुती 200 जागांच्या पार जाईल, असे मला वाटत नाही. मी अनेक निवडणुकांत भाग घेतला आहे. मात्र निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल याचे भाकित अचूक सांगता येत नाही.

तसेच मी शिवसेना प्रमुख्यांच्या विरोधात कधीही बोलत नाही. त्यामुळे सांगतो की, यावेळी राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मनोहर जोशी म्हणाले, आदित्य ठाकरे यांना महत्त्वाचे पद मिळणार हे निश्‍चित आहेत. मात्र त्यांना कोणते पद मिळेल हे योग्यवेळी समजेल.

भविष्यात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतील. लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे की निवडून आलेला व्यक्ती कोणत्याही पदावर जाऊ शकतो. त्यामुळे मला विश्वास आहे की, आदित्य ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे मनोहर जोशी यांनी म्हटले.

निवडणूक काळातील शरद पवारांच्या सभा आणि दौऱ्यांवर मनोहर जोशी म्हणाले, शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत. मात्र ते करतात ती प्रत्येक गोष्ट योग्य असते, असे नाही. शरद पवारांच्या सभा, दौऱ्याचा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला किती फायदा होईल हे आताच सांगता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.