महायुतीला 1 कोटी 70 लाख मतदान होणार

पुणे – राज्यात आगामी निवडणुकीसाठी साडेचार कोटी मतदारांपैकी भाजप-सेना आणि मित्र पक्षाला किमान 1 कोटी 70 लाख मतदान होईल. या निवडणुकीत महायुतीच्या 220 हून अधिक जागा येतील, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे व्यक्‍त केला.

चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सोमवारी पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापालिका सभागृह नेता श्रीनाथ भिमाले तसेच नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधून किती नेते संपर्कात आहेत, याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, या दोन्ही पक्षातून येणाऱ्यांची यादी मोठी आहे. ती आम्ही लवकरच जाहीर करू, त्याचबरोबर कॉंग्रेसने जे 5 कार्याध्यक्ष घोषित केले आहेत. ते याच भीतीतून केले आहेत. पक्ष सोडून जावू नये म्हणून ही पदे दिली आहेत. तरी सुद्धा एक कार्याध्यक्ष भाजपच्या वाटेवर आहे; पण याबाबत नाव नंतर जाहीर करू. भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या जरी जास्त असली तरी प्रत्येकाला आम्ही पारखून घेतो आणि मगच निर्णय घेतो. आमच्या विचारांशी जुळणारे असतील तर आम्ही त्यांना पक्षात योग्य स्थान देतो. राधाकृष्ण विखे-पाटील यांना सुद्धा आम्ही अशाच प्रकारे पक्षात घेतले आहे. पक्षात आला आणि लगेच मंत्रीपद दिले असे आम्ही गेल्या 5 वर्षांत कधीच केले नाही. मंत्रीमंडळात असणारे सुद्धा सगळे भाजपच्या विचारसरणीचे आहेत. 5 वर्षांत एकमेव विखे पाटील असे नेते आहेत की त्यांना आम्ही मंत्रीपद दिले. पक्षात घेताना सुद्धा आम्ही तेवढी काळजी घेतो. नाहीतर मग काय भुजबळ सुद्धा आले असते, असा टोलाही त्यांनी लगाविला.

आम्ही फक्‍त दोनच नेत्यांची मते गांभिर्याने घेतो
महायुतीच्या जागा वाटपावरून अनेक नेत्यांकडून वेगवेगळी विधाने करण्यात येत असली तरी राज्यातील विद्यमान आमदार तेच राहतील पण एखादी दुसरी जागा इकडे-तिकडे होईल. त्या व्यतिरिक्‍त फारसा बदल होईल, असे मला वाटत नाही. युतीबाबत येणाऱ्या वेगवेगळ्या विधानांकडे आम्ही लक्ष देत नाही; आम्ही फक्‍त दोनच नेत्यांची मते गांर्भियाने घेतो. त्यात एक देवेंद्रजी आणि दुसरे उद्धवजी. त्यामुळे इतर नेते काय बोलतात त्याकडे फारसे लक्ष देत नाही. जागा वाटपाचा निर्णय सुद्धा हेच दोघे घेतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)