पुणे – राज्यात महायुती सरकारच्या स्थापनेनंतर महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासह, महिला सुरक्षेला महायुती सरकारने सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर, महिला बचत गटांना अर्थसाह्य, महिलांना अर्ध्या दरात एसटी प्रवास, अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य कुटुंबातील महिला महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहतील, असा विश्वास पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ( Pune Cantonment Assembly Constituency) भाजप, महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी व्यक्त केला.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) व मित्रपक्षांचा महायुतीच्या महिला भगिनींची मातृशक्तीची महाबैठक सोमवार पेठेतील जनसागर हॉल येथे पार पडली. याप्रसंगी बैठकीस भाजपा पुणे शहर महिला अध्यक्षा देवयानी फरांदे, माजी नगरसेविका कालिंदा पुंडे, मंगला मंत्री, मनीषा लडकत, सरचिटणीस उज्ज्वला गौड, भाजपा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेच्या अध्यक्षा प्रियांका श्रीगिरी, उपाध्यक्षा माधुरी गिरमकर, पल्लवी केदारी, वैशाली सोनवणे, सुवर्णा भरेकर, मनीषा सोनवणे आणि इतर भगिनी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कांबळे म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या शासकीय योजना राबविण्यात आल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 37 हजारांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, ही सर्व कुटुंब माझ्या सोबतीला असतील, यात शंका नाही. कोविडच्या काळात सर्वसामान्य माणसाला अनेक अडचणी येत होत्या. या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली असल्यामुळे काम करणारा आपला हक्काचा माणूस म्हणून मतदार मला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वासही कांबळे यांनी व्यक्त केला. महिलांसाठीच्या योजना बंद करण्याचा डाव महाविकास आघाडी करत असून, मतदार हा डाव उधळून लावतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.