राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार; पियुष गोयल यांचा विश्‍वास

पुणे – काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करून भाजपने जम्मू ते कन्याकुमारी देश अखंड केला. मागील अनेक वर्षांपासून अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा मोदी सरकारने प्रयत्न केला आहे. तसेच, राज्यातील भाजप सरकारने शेती, लघुउद्योग, पर्यावरण आदी क्षेत्रात उत्तम प्रकारे काम केल्याने राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्‍वास केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गोयल बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट उपस्थित होते. गोयल म्हणाले, “मागील पाच वर्षांत सरकारने देशात 11 कोटी शौचालये बांधून स्वच्छतेचे अभूतपूर्व काम केले आहे. त्यामुळे राज्यातील जनता भाजपच्या पाठिशी असल्याने ही निवडून एकतर्फी आहे. भाजपच्या माध्यमातून पुणे शहरात विकासाभिमुख काम केल्याने शहरातील आठही मतदारसंघात भाजपचा विजय होणार आहे.’ तर, “डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती. याच सरकारच्या काळात चारा, कोळसा, सिंचन, आदर्श यासह अनेक घोटाळे देशभरात झाले. मात्र, भाजपच्या काळात भ्रष्टाचाराच्या घडना घडलेल्या नाहीत. याउलट, मनमोहन सिंग सरकारच्या काळात देश भ्रष्टाचाराने ग्रासलेला होता,’ अशी टीका गोयल यांनी कॉंग्रेसवर केली.

बॅनर्जी डाव्या विचारसरणीचे
नोबेल पुरस्कार विजेते व अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी भारताची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे केलेले विधान चुकीचे आहे. भाजपने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम केले आहे. तसेच बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीचे असून त्यांनी कॉंग्रेसच्या “न्याय’ योजनेचे कौतुक केले होते. परंतु, ती योजना अपयशी असल्याचे सांगत बॅनर्जी यांच्या विधानावर गोयल यांनी टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.