Maharashtra Assembly Election 2024 | विधासभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानंतर आता महायुतीचा प्रचाराचा प्रारंभ करवीरनगरीमधून होणार आहे. कोल्हापुरातून प्रचाराचा प्रारंभ करण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत घेतला आहे.
त्यानुसार मंगळवारी दुपारी ४ वाजता तपोवन मैदानावर महायुतीची पहिली जाहीर सभा होईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. याआधी २०१४ साली महायुतीच्या विधानसभेच्या प्रचाराचा प्रारंभ इचलकरंजीतून करण्यात आला होता.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. महायुतीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त सभा घेण्यावर महायुतीचा भर राहणार आहे.