महायुतीनेच विकासपर्व आणले : मुक्‍ता टिळक

पुणे – कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने केवळ नकारात्मक राजकारण केले. मात्र, देशासह महाराष्ट्र, पुण्यात आणि कसबा विधानसभा मतदारसंघात खरा विकास पोहचवला तो भाजप-शिवसेना महायुतीच्या शिवशाही सरकारनेच. हेच विकासपर्व कायम राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे प्रतिपादन कसबा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांनी केले.

टिळक यांच्या प्रचारार्थ रविवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी संवाद साधला. मुठा नदीपात्रातून सुरू करण्यात आलेली ही रॅली समाधान चौक, राष्ट्रभूषण चौक, लोहियानगर, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर मार्ग या मार्गांनी शनिवार वाडा येथे रॅली विसर्जित झाली. यावेळी नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून शुभेच्छा देत मतदारांनी टिळक यांचे जोरदार स्वागत केले.

टिळक म्हणाल्या, नगरसेवक आणि महापौरपदाच्या कालावधीत जनतेची सेवा करता आली. भेटीदरम्यान जनतेच्या चेहऱ्यावरील समाधान मला आनंद देऊन जाते. दिशाभूल करणाऱ्या नकारात्मक राजकारणाला मतदार कधीच भूलणार नाहीत. तसेच आपल्यालाही भरघोस मतांनी निवडून देतील, असा विश्‍वासही टिळक यांनी यावेळी व्यक्त केला.

हेल्मेट परिधान करत नियमांचे पालन
मुक्‍ता टिळक यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या या दुचाकी फेरीत टिळक यांनी स्वत: दुचाकी चालविली. मात्र, यावेळी त्यांनी स्वत: हेल्मेट परिधान करत वाहतूक नियमांचे पालन करत त्याबाबत मतदारांमध्येही जागृती केली. यावेळी अनेक सहभागी कार्यकर्त्यांनीही हेल्मेट परिधान केले होते. राज्यात सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत अनेक उमेदवार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असताना टिळक यांनी मात्र हेल्मेट परिधान करून नियम पाळल्याने सर्वांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.