पुणे : महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वार जोरदार वाहताना दिसत आहेत. त्यातच आता गणपतीचा सण असल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी आज पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवर आपली प्रतिक्रिया दिली.
नेमके काय म्हणाले अजित पवार?
गणपतीला काय साकडे घातले? असे अजित पवारांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पुण्याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे. पुण्यातील गणेशोत्सव याला जगात मान आहे. कसबा मानाचा पहिला गणपती आहे इथून मी सुरुवात केली आहे. सगळेच मानाचे आहेत, सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. गणरायाला प्रार्थना आहे की सगळीकडे सुख समृद्धि राहो. शेतकरी अडचणीत आहे त्याला मूळ पदावर कसे आणता येईल हा आमचा प्रयत्न आहे. मी गणेश भक्तांना शुभेच्छा देतो. लोकांच्या हातात सगळं आहे, मी काही मागत नाही. सगळ्यांना सुख शांती समाधान मिळावं ही प्रार्थना गणरायाकडे केली असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
यावेळी त्यांना बारामतीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या झळकलेल्या पोस्टर बाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, चालायचं!! इतक्या बारक्या गोष्टी मध्ये लक्ष द्यायची गरज नाही. आमची महायुती आहे, खालच्या प्रत्येक लोकांकडे लक्ष देता येत नाही. या लोकांना तुम्ही प्रसिध्दी देता. कारण नसताना युती मध्ये अंतर आहे का असा प्रयत्न केला जातो असे म्हणाले आहेत. यादरम्यान त्यांनी अरे बाप रे! मला आता बारामती सुद्धा म्हणायची पण भीती वाटायला लागली असे म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मिश्कीलपणे टोला लगावला.