पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणेकरांच्या सर्वाधिक उत्साहाच्या व आनंदाच्या गणेशोत्सवामध्ये मंडळांनी उभारलेले देखावे, विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. या उत्सवात सुरळीत वीजपुरवठा व वीज सुरक्षेसाठी महावितरणची पुणे परिमंडल अंतर्गत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमध्ये सुमारे ४ हजार ५७५ अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच दुरुस्ती कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांचे कर्मचारी आवश्यक साहित्य व साधनसामग्रीसह वीज ग्राहकांना सेवा देत आहेत.
लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीसाठी मोदी गणपती परिसरात तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी अभियंते व कर्मचार्यांची विशेष नियुक्ती करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली आहे.
भाविकांना आवाहन…
– महावितरणचे अभियंते, कर्मचारी तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीज सुरक्षेबाबत सतर्क व सजग राहावे.
– सर्व नागरिकांनी वीजयंत्रणेपासून योग्य सुरक्षित अंतर राखावे
– प्रामुख्याने लहान मुले तसेच नागरिकांनी देखावे किंवा मिरवणूक पाहण्यासाठी वीजयंत्रणा किंवा फीडर पिलरवर चढू नये किंवा त्याचा आधार घेऊ नये. तसा कोणी प्रयत्न करत असेल परावृत्त करावे.
– ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये उभे राहून उंच झेंडे उंचावताना वीज वाहिन्यांपासून सावध राहावे