पुणे – महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यात वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीची बिले पाठविली असून, ती एकरकमी अथवा सहा मासिक हप्त्यांमध्ये भरता येणार आहेत. आर्थिक अडचणींमुळे अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले भरणे शक्य नसल्यास वीस किलोवॉटपेक्षा कमी जोडभार असलेल्या ग्राहकांना प्री-पेड मीटरच्या मागणीचा पर्यायही उपलब्ध आहे.
राज्यातील सर्व वीज ग्राहकांना चालू वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले देण्यात आली आहेत. त्यावरून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वीज नियामक आयोगाच्या वीजपुरवठा संहितेनुसारच ग्राहकांकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारली जाते, असा दावा महावितरणने केला आहे. यापूर्वी सुरक्षा ठेवीची रक्कम एका महिन्याच्या बिलाइतकी होती. मात्र, नवीन नियमांनुसार एप्रिल 2022पासून ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्येही अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची बिले आली होती. त्यावेळी भरणा केला नाही, त्यांना यंदा पुन्हा बिले पाठविण्यात आली आहेत.
प्रीपेड वीजमीटर कसे मिळवावे?
प्रीपेड मीटरसाठी वीस किलोवॅटपेक्षा कमी जोडभार असलेल्या वीजग्राहकांना संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज करता येईल. संबंधित कार्यालयाकडून अर्जावर सहीशिक्क्याची पोचपावती घ्यावी. त्यानंतर महावितरण अतिरिक्त सुरक्षा ठेवींसाठी सक्ती करू शकत नाही. बिले भरण्यासाठी कोणता पर्याय निवडायचा हा वीजग्राहकांचा हक्क असून, महावितरणला ग्राहकांची कोणत्याही पर्यायाची मागणी नाकारता येणार नाही, असे वीज प्रश्नांचे अभ्यासक प्रताप होगाडे यांनी सांगितले.
नियमाप्रमाणे व्याज
वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल, तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीज ग्राहकांना अदा करण्यात येते, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.