ठेकेदाराविरोधात महावितरण पोलिसांत

खोदकामात दुसऱ्यांदा केबल तोडली ः 2 हजार वीज ग्राहकांना फटका 

वाकड –  वाकड परिसरातून जाणारी महावितरणची उच्चदाब वाहिनीची भूमिगत केबल दुसऱ्यांदा तोडणाऱ्या महापालिका ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी महावितरणकडून वाकड पोलिसांकडे करण्यात आली आहे.
महावितरणच्या ताथवडे शाखेचे सहाय्यक अभियंता प्रकाश नाईकवाडे यांनी याबाबत वाकड पोलिसांना तक्रार अर्ज दिला. त्यात म्हटले आहे की, बजरंगबली कन्स्ट्रक्‍शनमार्फत वाकड परिसरात ड्रेनेज लाईनचे काम सुरु आहे. भूमिगत काम करताना कंपनीकडून महावितरणला कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. महावितरणच्या उच्चदाब व लघुदाब असणाऱ्या वाहिन्या भूमिगत टाकण्यात आल्या आहेत. भूमिगत कामे करताना याबाबतची माहिती महावितरणला देणे आवश्‍यक आहे.

बजरंगबली कन्स्ट्रक्‍शनकडून यापूर्वी महावितरणची 22 हजार वोल्ट्‌स क्षमतेची उच्चदाब व लघुदाब वाहिनी तोडली होती. त्यानंतर मंगळवारी (दि. 18) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाकड येथील रिद्धी-सिद्धी हाईटस्‌समोर काम करत असताना पुन्हा महावितरणची केबल तोडण्यात आली. यामुळे वाकड परिसरातील 2 हजार 120 ग्राहकांचा वीज पुरवठा
खंडित झाला.

एकदा विद्युत वाहिनी तुटल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी किमान चार तासांचा कालावधी लागतो. तसेच एका केबलसाठी महावितरणला सुमारे 56 हजार रुपयांचा आर्थिक भास सहन करावा लागतो. तसेच वारंवार केबलची दुरुस्ती केल्यास केबल कमकुवत होते. बजरंगबली कन्स्ट्रक्‍शनकडून महावितरणला कोणतीही सूचना दिली जात नसल्याने महावितरण आणि परिणामी ग्राहकांना याचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे बजरंगबली कन्स्ट्रक्‍शन कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलीस काय भूमिका घेणार याकडे महावितरणचे लक्ष लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)