बारामती – वीजबिल भरण्याच्या माध्यमातून रोजगार व अतिरिक्त उत्पन्नांची संधी देणाऱ्या महावितरणच्या वॉलेटसाठी बारामती परिमंडलमध्ये मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 476 तर बारामती मंडलात 117 जणांनी नोंदणी केली आहे.
महावितरणने वीजबिल भरण्यासाठी वॉलेट तयार केले आहे. या वॉलेटद्वारे वीज बिलांचा भरणा केल्यास प्रती पावतीमागे 5 रुपये कमिशन देण्यात येणार आहे. शहरासोबतच प्रामुख्याने ग्रामीण भागात या वॉलेटद्वारे रोजगार संधी निर्माण होत आहे. बारामती मंडलमधील सासवड – 31, केडगाव – 34 व बारामती विभागातील 54 अशा एकून 117 जणांचा समावेश आहे. या वॉलेटद्वारे वीज ग्राहकांना स्वतःचे वीजबिल भरता येईल. त्याचप्रमाणे बचत गट, जनरल स्टोअर्स, मेडिकल दुकानदार, किराणादुकान आदी छोटे-मोठे व्यावसायिक, बचत गट, महावितरणचे वीजबिलवाटप व रिडींग घेणाऱ्या संस्थांना या वॉलेटद्वारे ग्राहकांच्या वीजबिलांचाभरणा करून उत्पन्न मिळविता येणार आहे.
वॉलेट नोंदणीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे. त्यानंतर संबंधित उपविभाग कार्यालयाकडून अर्जदारांच्या अर्जांची व जागेची पडताळणी करण्यात येईल. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. डेबीट, क्रेडीट कार्ड, नेटबॅकींगद्वारे रिचार्जची सोय उपलब्ध आहे. वॉलेट रिचार्ज केल्यानंतर वॉलेट ऍपद्वारे महावितरणच्या वीजग्राहकांकडून वीज बिलांची वसुली करता येईल. वीजबिलांचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठविला जाईल. विशेष म्हणजे एका वॉलेटमधील शिल्लक रक्कम वापरून सबवॉलेटद्वारे एकापेक्षा अधिक व्यक्ती ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करू शकणार आहेत.