वीजबील वसुलीसाठी आता मोबाईल व्हॅन

पुणे – वीज ग्राहकांना वीजबील भरणे अधिक सोपे जावे यासाठी महावितरण प्रशासनाने जालिम उपाय शोधला आहे. वीजबीलाची वसुली करण्यासाठी कर्मचारी मोबाईल व्हॅनमधून गावोगावी आणि घरोघरी फिरणार आहेत. तसेच, ग्राहकांना त्याचा लाभ व्हावा यासाठी ही व्हॅन आठवडे बाजारातही उभी राहणार आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यासह चंद्रपूर, अकोला आणि नागपूर या परिमंडलात ही सुविधा सुरू केली असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य परिमंडलातही त्याची अंमलबजावणी होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्राहकांना लाभ होणार आहे, त्याशिवाय महसुलातही वाढ होणार आहे.

गेल्या काही वर्षांत महावितरण प्रशासनाने राज्यभरातील वीजयंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यानंतर प्रशासनाने आता आपला मोर्चा महसूल वसूलीकडे वळविला आहे. त्यासाठी वीजबील भरणा केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत शहरी आणि ग्रामीण भागांत सहकारी बॅंका, पतसंस्था आणि खासगी वीजबील भरणा केंद्रांची संख्या साडेबारा हजारांच्या आसपास आहे. त्याशिवाय मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, महसुलामध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. विशेषत: वीजबीलांचा भरणा करण्यात खेडेगांवातील ग्राहकांची संख्या अपेक्षित वाढलेली नाही, परिणामी महसुलाचा हा टक्का दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्याला उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने ग्रामीण आणि शहरी भागांतही मोबाईल व्हॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्राहकांना वीजबील भरणा करणे अधिक सोयीचे व्हावे यासाठी ही व्हॅन सज्ज ठेवण्यात आली असून महावितरणचे कर्मचारी त्या-त्या भागांत फिरून ग्राहकांना वीजबीलाचा भरणा करण्याचे आवाहन करणार आहेत, अशी माहिती देऊन पाटील म्हणाले, या मोबाईल व्हॅनमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही व्हॅन गावासह संबंधित ठिकाणच्या आठवडे बाजारातही जाणार आहे. त्याठिकाणी दिवसभर थांबणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वीजबील भरणे अधिक सोयीचे जाणार आहे, त्यातूनच प्रशासनाचा महसूलही वाढणार आहे. या मोहिमेची अधिक व्याप्ती वाढविण्याचा प्रशासन विचार करत आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)