सातारा पालिका निवडणूक महाविकास आघाडी ताकदीने लढणार

दीपक पवार; शरद पवारांशी चर्चा, अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा

सातारा  – गेली 50 वर्षे सातारकरांनी दोन्ही राजांच्या ताब्यात नगरपालिकेची सत्ता दिली; पण त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. आम्हाला फक्त पाच वर्षे सत्ता द्या, सातारकरांना समस्यांमधून मुक्त करू, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी व्यक्त केला. पालिका निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून, पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीच्यावतीने निवडणुका लढवाव्यात, अशी सूचना त्यांनी दिली आहे. साताऱ्यातील अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचा दावाही दीपक पवार यांनी केला.

सातारा येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माझा जन्म सातारा शहरात झाला असून, येथील समस्यांची जाण मला आहे. सुमारे 50 वर्षे दोन्ही राजांची पालिकेवर सत्ता असूनही जनतेसाठी सत्तेचा वापर कमी प्रमाणात झाला आहे. आजही सातारकर मूलभूत प्रश्‍नांसाठी झगडत आहेत. पालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याच्या शरद पवार यांच्या सूचनेनुसार बैठकांचे सत्र सुरू आहे. साताऱ्यातील अनेक नाराज नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आम्हाला पाठिंबा मिळत असून आगामी निवडणुकीत पालिकेत सत्तांतर होईल. काही लोकांना फुकटचे श्रेय घेण्याची सवय असून आम्हाला डांगोरा पिटण्याची गरज कधी वाटली नाही.

सातारा शहर, तालुका व जावळीतील अनेक कामांना निधी मिळवून देण्यासाठी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षातील सर्वांचे सहकार्य मिळाले आहे. यापुढेही जनतेसाठीच कार्यरत राहणार आहे. सातारा पालिकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीयांची एकजूट करू. याबाबतचे सगळेच पत्ते आताच उघड करणार नाही. साताऱ्यातील समस्यांबाबत गेली कित्येक वर्षे आम्ही आवाज उठवला असला, तरी कधी डांगोरा पिटला नाही, असा टोला दीपक पवार यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लगावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.