मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही मंहिने शिल्लक आहेत. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही तयारीला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून लवकरच राज्यभर सभा बैठका घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडी 16 ऑगस्ट ला प्रचाराचा नारळ फोडणार आहे तर महायुती 20 ऑगस्टला आपला प्रचार सुरू करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया महायुती आणि महाविकास आघाडीची रणनीती…
महाविकास आघाडीची नेमकी काय रणनिती आहे?
विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पहिली सभा मुंबईमध्ये 16 ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याच सभेतून महाविकास आघाडी विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरीवरून आज पासून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झालेली आहे. तर उद्यापासून काँग्रेस पक्षाचे नेते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत.
काय आहे महायुतीची रणनीती?
काल रात्री उशिरा प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि समन्वय समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 20 ऑगस्टला कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेऊन महायुती संवाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. महायुतीचे 288 मतदार संघामध्ये ही संवाद यात्रा होणार आहे. कोल्हापूरमध्ये सुरुवात केलेल्या संवाद यात्रेची सांगता मुंबईमध्ये होणार आहे.एका दिवसाला दोन किंवा तीन मतदारसंघांमध्ये ही संवाद यात्रा होईल. या संवाद यात्रेचा दौरा कमीत कमी सात दिवस आणि जास्तीत जास्त दहा दिवसांचा असणार आहे. राज्याच्या सातही विभागामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहे.