मुंबई : देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचं संकट रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले. ठाकरे सरकारविरोधात घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. ‘माझं अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ अंतर्गत हे निषेध आंदोलन करण्यात आले. तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकासआघाडीनं महाराष्ट्रद्रोही भाजप असे आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्रद्रोही BJP हा ट्रेंड ट्विटरवर सुरु केला आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. कोरोनाला रोखण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे.
संकट मोठं आहे म्हणून सहकार्य करा, असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे आम्ही आणि सामान्य जनतेनेही सहकार्य केलं. पण आता लोकांच्या मनातील राग अधिक काळ लपवून राहू शकत नाही, असं सांगतानाच ठाकरे सरकारचं अपयश आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यातील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिले आहेत, असं पाटील यांनी सांगितलं होतं.
दरम्यान आज भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभं राहून काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला गेला. दुसरीकडे महाविकास आघाडीनं भाजपविरोधात सोशल मीडियावर आंदोलन सुरु केलंय.