‘महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकेल आणि…’ – शरद पवार

शरद पवार यांनी शिवसेनेवरही व्यक्त केला विश्‍वास

मुंबई – महाविकास आघाडी सरकार आता पडणार, तेव्हा पडणार असं अनेक मुहुर्त भाजपचे नेते देत असतात. पण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल आणि आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करेल, असे म्हणत एकच धुरळा उडवून दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने बोलत असताना शरद पवार यांनी आगामी काळात राज्यातील निवडणुकीचे चित्रच बदलून टाकले आहे. शरद पवार म्हणाले, आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिले. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असे कोणला पटले नसते. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकत आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे.

आम्ही कधी शिवसेनेसोबत काम केले नव्हते. पण, शिवसेना हा विश्वास ठेवणारा पक्ष आहे, त्यांच्यामुळे कॉंग्रेस सुद्धासोबत आली आणि महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला स्विकारले, देशाने स्विकारले. महाविकास आघाडी सरकार हे भक्कम असून पाच वर्षे टिकेल आणि आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, असे माझ्या वाचण्यात आले. त्यानंतर अनेक जण तर्कवितर्क लढवत आहे. महाराष्ट्र शिवसेनेला खूप वर्षांपासून पाहत आहे. माझा पूर्वीचा अनुभवानुसार, हा विश्वासाचा पक्ष आहे, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, तुमच्या मागे जो सामान्य माणूस आहे. त्याच्याशी बांधिलकी जपा. आपले अनेक सहकारी सोडून गेले, पण तरीही राष्ट्रवादीने आपली सत्ता स्थापन केली आणि राज्यात नेतृत्व करण्याची फळी निर्माण केली. राजकारण सांभाळण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. सत्ताही महत्त्वाची आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताही महत्त्वाची आहे, असेही पवार म्हणाले.

नवीन नेतृत्व तयार झाले
पक्षातून काही लोक गेले, पण त्यामुळे नवीन लोक आल्याने नवीन नेतृत्व तयार झाले. मंत्रीमंळातील अनेक जण नवी जबाबादारी पार पडण्यात यशस्वी होत आहेत. एरव्ही हे लोकांसमोर आले नसते. देशात एवढं मोठं संकट आले असताना महाराष्ट्रात गंभीर स्थिती होती. संकटाचा सामना करण्यासाठी आणि लोकांना दिलासा, विश्वास देण्यासाठी राजेश टोपेंच्या नेतृत्वात आरोग्य खात्याने काम केले आणि त्याचा परिणाम या सगळ्या संकटातून बाहेर पडू शकतो, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. राजेंद्र शिंगणे, टोपे अशा प्रत्येकाने आपली जबाबदारी उत्तमपणे पार पडली. महाराष्ट्राला नेतृत्वाची फळी देऊन विश्वास देण्याचे काम राष्ट्रवादीने केले, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.