Mahavikas Aghadi Press – नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर व कोकण या तीन शिक्षक मतदारसंघांतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ५ जागांसाठी ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असतानाही महाविकास आघाडीचे अद्याप उमेदवारांच्या नावावर एकमत झालेलं नाही. याच पार्श्वभूमीवर आज दुपारी २ वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकारपरिषद होणार असून यामध्ये उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, नाशिक पदवीधर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी चांगलीच तोंडावर पडली आहे. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती. येथून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र तांबे यांनी एबी फॉर्म असतानाही उमेदवारी दाखल केली नाही. त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत पक्षविरोधात बंडखोरी केली. यानंतर शिवसेनेने येथे शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता.
आजच्या पत्रकारपरिषदेत नाशिक येथून शुभांगी पाटील तर नागपूर येथून काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडी पाठिंबा जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.