भोर, (प्रतिनिधी) – आमदार संग्राम थोपटे यांच्या विजयासाठी भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून आमदार संग्राम थोपटे यांना राज्याच्या विधानसभेत चौथ्यांदा पाठवण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार अशोक मोहोळ यांनी केले.
यावेळी विदुरा नवले, पुणे जि.प.च्या माजी अध्यक्षा सविता दगडे, भोरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, महादेव कोंढरे, शिवसेना उबाठाचे ज्ञानेश्वर शिंदे, शिवसेना उबाठाचे अमरावतीचे संपर्क प्रमुख अशोक शिवतरे, साँलिसीटर प्रसाद शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे यांनी आज २०३ भोर विधानसभा मतदार संघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे महाविकास आघाडीचे नेते बोलत होते.
या वेळी माजी खासदार अशोक मोहोळ म्हणाले, भारताला स्थैर्य देण्याचे काम काँग्रेसने केलेले आहे.जागतिक मंदीच्या काळात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने याची झळ भारतात पोहचली नाही. या मतदार संघात माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी विकासाचा डोंगर उभा केला असून आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठिशी तरुणांची मोठी साथ आहे.
यावेळी माजी खासदार नानासाहेब नवले, जि.काँ.चे माजी अध्यक्ष देवीदास भन्साळी,कौस्तुक गुजर,श्रीरंग चव्हाण,स्वरुपा थोपटे,सविता दगडे, माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे, गीतांजली शेटे, महादेव कोंढरे,शैलेश सोनवणे,विठठल आवाळे, रवींद्र बांदल,
माणसिंग धुमाळ, अभिषेक येलगुडे,सदीप नांगरे,माऊली शिंदे,विठठल शिंदे, प्रसाद शिंदे, पृथ्वीराज थोपटे,बाळासाहेब थोपटे,सुभाष कोंढाळकर, महेश टापरे, गंगाराम मातेरे,लहु शेलार,सचिन हर्णसकर,सुमंत शेटे, अमित सागळे, जगदीश किरवे,संदीप नगिने,नाना राऊत,राहुल जाधव,संतोष साखरे,शिवाजी जांभुळकर,संदीप हुलावळे,रामभाऊ ठोंबरे आदी मान्यवारांसह सुमारे १५ हजारांपेक्षा अधिक जनसमुदाय उपस्थित होता.
प्रास्ताविक भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी केले. भोर विधानसभेला आमदार संग्राम थोपटेंना मुळशी तालुक्यातून एक नंबरचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास शरद पवार पक्षाचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी व्यक्त केला.
अशोक मोहोळ म्हणाले, आमदार थोपटे यांचा प्रचार सुरू असून महायुतीचा उमेदवार अद्याप ठरत नाही. यातच थोपटेंचा विजय आहे. मुळशी तालुका थोपटेच्या मागे कायम आहे. लाडकी बहीण राज्यात सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र म्हणजे मध्यप्रदेश नाही.
शक्तीप्रदर्शनाने अर्ज केला दाखल
सभेनंतर भोर महाड रस्त्यावरील अनंतनगर वसाहत ते चौपाटी शिवाजीमहाराज पुतळा चौक येथे जेसीपीमधून फुले उधळण्यात आली. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार संग्राम थोपटे यांनी पुष्पहार अर्पण केला.
नगरपलिका चौकात घोषणा देत मंगळवारपेठेतून रॅली राजवाडा चौकात आली. यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. विकास खरात यांच्याकडे आमदार संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.