मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण मागच्या 5 वर्षांपासून फार खालच्या स्तरावर गेले आहे. या 5 वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या 5 वर्षात राज्याला 3 मुख्यमंत्री मिळाले. राज्यातील दोन प्रमुख पक्ष फुटले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली. आता राज्यात पुन्हा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.
महाविकास आघाडी काही तासात फुटणार
निवडणूक जाहीर झाली असली तरी महायुती आणि माविआ यांच्यात जागावाटपावरून अजून तिढा कायम आहे. यादरम्यान शिवसेना ( शिंदे गट) पक्षातील एका नेत्याने माविआ संदर्भात मोठा दावा केला आहे. उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील प्रचंड मतभेदांमुळे काही तासांत महाविकास आघाडी तुटेल, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
उध्दव ठाकरे, नाना पटोले मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यावरून दोघांमध्ये कलगीतुरा रंगल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवार हे दोन्ही पक्षांना संपवतील असे रामदास कदम म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.