महात्मा गांधींना म्हटले पाकिस्तानचे राष्ट्रपिता; भाजप नेत्याचे पक्षातून निलंबन

नवी दिल्ली: भाजपचे काही नेते वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत आहेत यामध्ये अनंतकुमार हेगड़े, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर आणि नलीन कटील यांचा समावेश आहे. भाजपने देखील यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, महात्मा गांधींना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटल्याप्रकरणी भाजपने मध्य प्रदेशातील नेता अनिल सौमित्र यांना निलंबित केले असून ७ दिवसात उत्तर मागितले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे ला होणार आहे. त्यापूर्वी नथुराम गोडसे वरून भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजप चांगलेच अडचणीत आले आहे.

या वक्तव्यांवर आता भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही नाराजी दर्शवली आहे. मागील दोन दिवसांपासून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, अनंतकुमार हेगडे आणि नलीन कटील यांचे विधान त्यांचे वैयक्तिक मत असून या वक्तव्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे अमित शहा यांनी ट्विटरवरून म्हंटले आहे. तसेच याप्रकरणी संबंधित नेत्यांना जाब विचारला जाईल, असे शहा यांनी सांगितले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याबद्दल नरेंद्र मोदींनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले, “गांधीजी किंवा गोडसेबाबत जी काही वक्तव्य केली आहेत, ती अत्यंत चुकीची आहेत. घृणास्पद आहेत. कुठल्याही सभ्य समाजात अशा प्रकारची वक्तव्य सहन केली जाऊ शकत नाहीत. त्यांनी माफी मागितली ती वेगळी गोष्ट आहे, मात्र मी माझ्या मनापासून त्यांना माफ करु शकत नाही”.

Leave A Reply

Your email address will not be published.