पुणे : खराडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मासिटिकल सायन्सेस आणि रिसर्च सेंटर या महाविद्यालयांमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी देशाचे महापिता महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी करण्यात आली.
या जयंती दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालय आणि परिसरमध्ये स्वच्छता अभियान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख भाग्यश्री शेलार, प्राध्यापक नितीन नेहरकर आणि पदविका विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख ज्योती दरकुंडे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदचे माजी सदस्य डॉक्टर अशोक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले .
महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त दुपारच्या सत्रामध्ये महाविद्यालयांमध्ये महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक पदविका महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रुचिता भालेराव यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक भोसले, उपप्राचार्य डॉक्टर विजया बर्गे आणि पदविका विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर अश्विनी शेवाळे, डॉक्टर सुजित काकडे उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक भोसले यांनी प्रथमता सर्व विद्यार्थ्यांना महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये किती मोलाचे योगदान दिले आहे याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अहिंसा, बंधुभाव आणि समानता यांचे पालन करावे असे त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर विजया बर्गे यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजी यांनी केलेले विविध सत्याग्रह, चळवळी याबद्दल माहिती दिली. पदविका विभागाच्या डॉक्टर अश्विनी शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये महात्मा गांधीजी यांच्याकडून प्रेरित होऊन आपले जीवनामधील ध्येय कसे गाठावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानिमित्त पदविका विभागाच्या अथर्व पाटील आणि अनम शेख तसेच पदवी विभागातून आरती दोरगे आणि रेखा चौधरी या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंती बद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदचे माजी सदस्य डॉक्टर अशोक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पदविका विभागाच्या प्राध्यापिका ज्योती दरकुंडे यांनी केले.