कुआलालांपूर (मलेशिया) – मलेशियातील सत्तासंघर्षामध्ये प्रतिस्पर्धी गटाकडून महाथिर मोहमद यांची हार झाली असून मुहिद्दीन यासिन यांचा उद्या पंतप्रधान म्हणून शपथविधी होणार आहे. राजघराण्याच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
गेल्या आठवड्याभरापासून मलेशियाच्या राजकारणामध्ये अनिश्चिततेचे वातावरण होते. पंतप्रधान पदावरून पायउतार झालेले महाथिर हे पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी खासदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही.
जनतेच्या कल्याणासाठी देशाला ताबडतोब पंतप्रधानांची आवश्यकता आहे.
पंतप्रधानांशिवाय अधिक काळ देशाचा कारभार राहू शकणार नाही, असे राजघराण्यातून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपल्याला संसदेतील खासदारांकडून बहुमताचा पाठिंबा दर्शवल्याने मलेशियाच्या राजांनी पंतप्रधान म्हणून यासिन यांची नेमणूक केली. याबरोबरच 94 वर्षीय महाथिर यांची पंतप्रधानपदाची कारकिर्द समाप्त झाली आहे. त्याचबरोबर महाथिर यांचे पूर्वाश्रमीचे समर्थक आणि सध्याचे कट्टर प्रतिस्पर्धी अन्वर इब्राहिम यांच्या पंतप्रधान बनण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत.
मुहिद्दीन यांच्या आघाडीच्या सरकारमध्ये देशातील बहु-वंशीय मुस्लिमांचे वर्चस्व आहे, सरकारमध्ये युनायटेड मलेशिया नॅशनल ऑर्गनायझेशन (यूएमएनओ) आणि गैरव्यवहारात अडकलेले माजी नेते नजीब रझाक यांचा समावेश आहे.