मुंबई – केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्कृष्ट तपासकार्यासाठी देशातील 96 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशेष पोलीस पदक जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एक उपअधिक्षक आणि दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह 11 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
विशेष पोलीस पदक जाहीर केलेल्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील पोलीस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक सर्वश्री अविनाश आघाव, सुरेश रोकडे, प्रदीप भानुशाली, हेमंत पाटील, सागर शिवलकर, संजय निकुंबे, सुधाकर देशमुख आणि सहायक पोलीस निरीक्षक सचिन माने यांच्यासह श्रध्दा वायदांडे आणि प्रियंका शेळके या महिला सहायक पोलीस निरीक्षकांचाही समावेश आहे. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोण निर्माण व्हावा तसेच उत्तम तपासकार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्यावर्षी पासून उत्कृष्ट तपासकार्यासाठी “विशेष पोलीस पदक’ पुरस्कार सुरु केला आहे.
यावर्षी उत्कृष्ट तपासकार्यासाठी देशभरातील 96 पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि अमंलीपदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी)च्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.