निमोणे -येथे घाटकोपर येथून आलेला 47 वर्षीय व्यक्ती करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर निमोणेगाव व परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 14 दिवस मेडिकल, दवाखाने या वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, बॅंका बंद राहणार आहेत. निमोणे येथील करोनाबाधित रुग्णाला आधीच क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यामुळे तो कोणाच्याही संपर्कात आलेला नाही. अशी माहिती ग्रामसेवक विकी पोळ तसेच सरपंच बेबीताई भालेकर यांनी दै. प्रभातशी बोलताना दिली.
26 मे रोजी मुंबई येथील घाटकोपर परिसरातून 3 जणांचं कुटुंब निमोणे येथे आले होते. त्यात 47 वर्षीय व्यक्ती, त्याची पत्नी आणि मुलाचा समावेश होता. निमोणे ग्रामपंचायतीच्या वतीने या तिघांनाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. 30 मे रोजी या 47 वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने आरोग्य खात्याने त्यांना पुणे येथे पाठविले होते. तिथे तपासणीदरम्यान त्यांना करोना असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या संपूर्ण परिसरात हायपोक्लोराईड फवारणी करण्यात आली आहे. तसेच गावातील आशा वर्कर आणि शिक्षक यांच्या मिळून 13 टीम तयार करण्यात आल्या आहेत. या 13 टीम संपूर्ण गावात फिरून सर्वेक्षण करणार आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे तसेच निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा डॅनियल यांनी दिली.
पाच किलोमीटर परिसर बफर झोन
निमोणे गाव व परिसर दि. 1 जूनपासून 14 दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असून निमोणे गाव केंद्र स्थानी धरून 5 किमी परिसर बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी काढला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी वापरात येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त सर्व वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.