ओझर/निवृत्तीनगर -धालेवाडी (ता. जुन्नर) येथे डीजेच्या तालावर थाटामाटात पार पडलेल्या विवाह सोहळ्यातील नववधू-वर, आई-वडील, पै-पाहुणे, मित्र-मंडळी असे 23 जण आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर चार गावे सील करण्यात आली आहेत. त्यामुळे या लग्नसोहळ्यात हजेरी लावलेले सगळेच गॅसवर असल्याने आता ही साखळी किती मोठी होणार, याची भीती आहे. दरम्यान, 50 जणांच्या उपस्थितीच्या नियमास या सोहळ्यात हरताळ फासल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुकमधील मुलाचे धालेवाडीतील मुलीशी नुकताच विवाह झाला. वर-वधू एकाच तालुक्यातील असल्याने या विवाहात 50 वऱ्हाडींचा नियम पायदळी तुडवला गेला. आसपासच्या गावातील पै-पाहुणे आणि मित्र मंडळींच्या मोठ्या उपस्थितीत विवाह धुमधडाक्यात पार पडला. नियमांचा भंग इथेच थांबला नाही तर हिवरे बुद्रुकमध्ये रात्री डीजेच्या तालावर वरातही निघाली होती. त्यामुळे हा लग्न सोहळा एक चर्चेचा आणि भीतीचा विषय ठरला आहे.
दरम्यान, या 23 जणांच्या संपर्कात आलेल्यांपैकी हिवरे बुद्रुक येथून 21, शिरोली बुद्रुक येथून 3 व धालेवाडी येथून 6 असे 30 संशयित लेण्याद्री येथील कोविड सेंटर येथे पाठवण्यात आले आहेत. तसेच तीनही गावा मिळून 98 जणांना विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांच्यावर वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वर्षा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक एस. एम. गुंजकर, आरोग्यसेविका अयोध्या हांडे व आरोग्यसेवक अजय कासवेद लक्ष ठेवून आहेत. हिवरे बुद्रुक येथे 4 व धालेवाडी तर्फे हवेली येथे 14 रुग्ण सापडल्याने ही दोन्ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी घोषित केली असून या गावांमध्ये यापुढे कोणत्याही प्रकारचा धार्मिक अथवा सामाजिक कार्यक्रम घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात शासनाने केलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील.
-परशुराम कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक, ओतूर पोलीस ठाणे