सोमेश्वररनगर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांना कमी लेखणारे विधान केल्याबद्दल मराठी अभिनेते शरद पोंक्षे व बौद्ध समाजाबद्दल अपमानजनक विधान केल्याबद्दल मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांचा कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील बौद्ध युवक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
अभिनेते शरद पोंक्षे यांचे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुण्यातील काही विद्यार्थी संघटनांनी पोंक्षे यांना सुरुवातीलाच विरोध केला होता. यावेळी बोलताना शरद पोंक्षे यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्यापेक्षा स्वातंत्रवीर सावरकरांचे अधिक योगदान होते असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या निधनानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
फेसबुक वादग्रस्त पोस्टमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या केतकी चितळे यांनी पुन्हा एकदा फेसबुकवर हिंदू धर्माविषयी पोस्ट करताना बौद्ध समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे समजते.
वरील दोन्ही अभिनेत्यांनी बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे त्यांचा निषेध समतानगर येथील बौद्ध युवक संघटनेच्या वतीने करण्यात आला. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश चव्हाण, कार्यवाह अमर शिंदे, सल्लागार हेमंत गडकरी, निखील चव्हाण उपस्थित होते.