मुंबई – गृह प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या राज्यातील १० हजार ७७३ प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून १९५० प्रकल्पांचे बॅंकखाते गोठविण्यात आले आहे, असे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.
यासंदर्भात आमदार सरोज अहिरे, संजय केळकर यांनी प्रश्न विचारला होता. लेखी उत्तरात शिंदे म्हणतात, संबंधित विकासकांनी तीस दिवसांत प्रकल्प पूर्ण करण्याबाबत मुदतवाढीचा अर्ज किंवा भोगवटा प्रमाणपत्र महारेराकडे सादर करावे. अन्यथा महारेरा संकेत स्थळावर प्रकल्पास तात्पूरती स्थगिती करणे, बॅंक खाती गोठविणे, व प्रकल्पाशी संबंधित व्यवहारांवरही निर्बंध आणणे इत्यादी कारवाईबाबत नोटीस बजावण्यात येत आहे.
बॅंकखाते गोठविलेल्यांपैकी १०६ विकासकांनी प्रकल्पांचा वेळ वाढवून किंवा प्रकल्प भोगवटा प्रमाणपत्र दिल्याने त्यांच्यावरची तात्पूरती स्थगिती बाबतची कारवाई मागे घेण्यात आली आहे. तसेच ८ हजार ८२३ प्रकल्प छाननी प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.